जळगाव : जिल्ह्यातील विविध मंदिरांच्या प्रश्नांचा मागोवा घेत अॅड. सुशील अत्रे यांनी जिल्हाभर भ्रमंती करुन ‘लोकमत’ मधून प्रसिद्ध केलेल्या ‘देवळे रावळे’ या सदरांचे पुस्तक ‘देवळे रावळे’चे प्रकाशन रविवारी सायंकाळी ला.ना. विद्यालयाच्या गंधे सभागृहात चिमुकले राम मंदिराचे पुजारी दादा महाराज जोशी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी मंत्री सुरेशदादा जैन, प्रमुख पाहुणे पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे होते. व्यासपीठावर अॅड.अत्रे, नवजीवन सुपर शॉपचे संचालक अनिल कांकरिया उपस्थित होते.जो देतो तो देव, अशी व्याख्या देवाची केली जाते. त्याचप्रमाणे ज्या मनुष्याला सभ्यता, सरळता व सत्यता हे अंगी बाळगता आले तर तो देव होतो. चंद्र-सूर्य हे प्रत्यक्षात दिसणारे देव. त्यांच्याशिवाय धान्यही पिकू शकत नाही. आपण सगळ्या समाजाला प्रेम दिले तर माणसाचाही देव होऊन जातो, असे प्रतिपादन चिमुकले राम मंदिराचे पुजारी दादा महाराज जोशी यांनी केले. पुस्तकाचे लेखक अॅड.सुशील अत्रे यांनी मनोगतात सांगितले की, ‘प्राचीनत्व’ हा निकष ठेवून २०० अथवा त्यापेक्षा अधिक जुनी परंपरा असलेल्या मंदिरांना भेट देऊन माहिती घेतली. इंटरनेटवरून कोणतही माहिती न घेता स्वत: तेथील पुजारी, मंदिराबाहेर वर्षानुवर्ष फुलविक्री करणारे विक्रेते, इतकेच काय भिकाऱ्यांकडूनही माहिती घेतली. सुरूवातीला पाटणादेवी, पद्मालय, तरसोद अशी मंदिरे घेतली. त्याबाबतचे लेख ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध व्हायला लागल्यावर लोकांकडून स्वत:हून मला फोनयेऊ लागले. त्या मंदिरांनाही मी भेटी दिल्या. २०१४ मध्ये म्हसव्याच्या मंदिरासमोरच सूर्यमंदिर असल्याचे मला आढळून आले. त्याबाबत छापून आल्यानंतर आज त्या ठिकाणी जिर्णोद्धार होऊन मोठे मंदिर झाले. पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी विस्मरणात चाललेला वारसा अॅड.अत्रे यांनी डोळस श्रद्धेने बघत समाजासमोर आणला. हे कौतुकास्पद असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांनी तर आभार आकाश कांकरिया यांनी मानले. स्मृती जोशी हिने सादर केलेल्या पसायदान नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.----जिल्ह्याचा समृद्ध वारसा जगासमोर आला-सुरेशदादासुरेशदादा जैन म्हणाले की, अॅड.अत्रे यांनी २०१४ मध्ये वर्षभर जिल्ह्यातील प्राचीन देवळांना भेट देऊन अभ्यास करून वेगळ्या दृष्टीने लिखाण केले. ‘लोकमत’मध्ये निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी ते मालिका स्वरूपात प्रसिद्ध केले. जिल्हा परंपरेने किती समृद्ध आहे? याची माहिती त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचली. आज ते पुस्तक रूपात लोकांपर्यंत जात आहे.
‘देवळे-रावळे’ पुस्तकाचे जळगावात थाटात प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 10:54 AM
गंधे सभागृहात झाला कार्यक्रम
ठळक मुद्देअॅड.सुशील अत्रे यांचे ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते सदर जिल्ह्याचा समृद्ध वारसा जगासमोर आला-सुरेशदादा समाजाला प्रेम दिले तर माणसाचाही देव होऊन जातो-दादा महाराज जोशी