जळगाव - केसीई सोसायटीचे शालेय समन्वयक चंद्रकांत भंडारी यांनी लिहिलेल्या कंदीलक्लब या मराठी कादंबरीचा प्रकाशन सोहळा शनिवारी दुपारी ए.टी. झांबरे विद्यालयात पार पडला.
यावेळी कादंबरीचे प्रकाशन केसीई संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, अनिल शिंपी, रंगनाथ पाटील व मयूर भावे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रकाशनानंतर मयूर भावे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यात त्यानी लेखन प्रक्रिया, तिची व्याप्ती, त्यातून मिळणारा अनुभव व त्यातून व्यक्त होण्यासाठी होणारी धडपड लेखकाला अस्वस्थ करत असते. त्याचा अनुभव तो इतरांना वाचण्यातून आपल्या जवळचा भासवतो असे त्यांनी सांगितले.
भंडारी यांच्या लेखनातून विद्यार्थ्यांना सतत उपक्रमशील असा अनुभव येतो. शिक्षक कसा असावा हे भंडारीच्या योगदानातून व त्यांच्या लेखनातून अनुभव येतो असे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी कार्यक्रमात सांगितले. त्यानंतर शशिकांत वडोदकर यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी चंद्रकांत भंडारी यांनी कृतज्ञता व्यक्त करताना आपण लेखन थांबवत आहोत. ही माझी शेवटची कादंबरी आहे. लिखाणाने मला सन्मान मिळवून दिला असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणिता झांबरे यांनी केले.