लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सलग व जोरदार पाऊस नसल्याने त्याचा परिणाम उडीद-मुगाच्या पिकावर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने हंगाम येण्यापूर्वीच डाळींचे भाव कडाडले आहेत. यामध्ये उडीद व तूरडाळ १०० रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत तर मूगडाळ ९० रुपयांवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे सध्या जास्त मागणी नसली तरी भाववाढ होत आहे.
पावसाळा सुरू झाल्यानंतर जून, जुलै महिन्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यात मध्येच मोठा खंड पडत असून, ऑगस्ट महिन्यातही काही दिवस जोरदार हजेरी लावल्यानंतर पाऊस पुन्हा गायब होत आहे. सलग व पुरेसा पाऊस नसल्याने त्यांचा विविध पिकांसह उडीद-मुगावर अधिक परिणाम होत आहे. त्यामुळे ही पिके हातची जाण्याची भीती असून, हंगाम येण्यापूर्वीच बाजारात तेजी येऊ लागली आहे.
नवीन मालाची शाश्वती कमी
राज्यात पावसाची स्थिती पाहिली तर अनेक भागांत पाऊस कमी असून पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागात जास्त पाऊस झाला आहे. कमी पावसामुळे पिके कोमेजली तर जास्त पावसामुळे ती नष्ट झाली आहेत. या दोन्ही घटकांचा परिणाम कडधान्यावर होऊन काढणीनंतरही नवीन मालाची आवक किती राहील, याची शाश्वती राहिलेली नाही.
भाववाढीस सुरुवात
नवीन माल किती येईल, याची शाश्वती नसल्याने बाजारपेठेत मागणी नसताना तेजी येत आहे. यामध्ये १० दिवसांत डाळींचे भाव ५०० ते ६०० रुपये प्रति क्विंटलने वाढले आहेत. ९० ते ९४ रुपये प्रति किलोवर असलेली उडीदडाळ आता ९५ ते १०० रुपये प्रति किलोवर पोहोचली असून, ८४ ते ८५ रुपयांवर असलेली मूगडाळ ८६ ते ९० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. तूरडाळ ९० ते ९५ रुपयांवरून ९६ ते १०० रुपये, हरभराडाळ ६२ ते ६६ रुपयांवरून ६८ ते ७२ रुपये, मसूरडाळ ७८ ते ८२ रुपयांवरून ९० ते ९४ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.