जळगाव : केवळ सामान्यांनाच नव्हे तर राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांनाही दारूची ओढ लागली असल्याचे एका व्हीडिओतून समोर आले आहे. मद्यविक्रीच्या दुकानाची तपासणी करण्यासाठी गेलेला या खात्याचा निरीक्षक नरेंद्र दहीफळे हा चक्क दारूचा घोट रिचवतच नोंदी करीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला आहे.मद्यविक्रीची दुकाने लॉकडाऊनच्या काळात बंद होती. मात्र ती उघडल्यानंतर प्रत्येक दुकानांसमोर मद्यप्रेमींच्या रांगा लागल्या. मद्य शौकीन एवढ्या मोठ्या प्रमाणात जळगावात आहेत, असे चित्रच याकाळात उभे राहिले होते. मात्र आता सामान्यच नव्हे तर राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारीही मद्यशौकीन असल्याचे दिसून आले आहे. केवळ मद्यशौकीन आहेत असं नाही तर ते सेवा बजावतानाही मद्याची संगत सोडत नाही, असं दुर्दैवी वास्तव समोर आले.राज्य उत्पादन शुल्क खात्यातर्फे मद्य दुकानांची तपासणी सुरु असताना एक निरीक्षक तर एका मद्य दुकानात जाऊन त्याठिकाणी मद्याचा एकेक पेला रिचवतच नोंद करत असल्याचे या व्हिडिओत दिसून येत आहे. सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झालेल्या या व्हिडिओने पुन्हा एकदा जळगावचे नाव राज्यस्तरावर बदनाम झाले आहे.
घोट-घोट रिचवत मद्य साठ्याचा पंचनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 12:02 PM