मास्क न वापरणारे अशांवरही कारवाई करा
पारोळा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेसह आशिया महामार्ग ४६, कजगावरोड या ठिकाणी असलेली दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेत सुरू ठेवण्याबाबत आदेश आहेत. पण या वेळेत मात्र सर्व प्रकारची दुकाने बाजारपेठेत उघडी असतात. यावर पालिका पथकाने मात्र ११ वाजेनंतर जी दुकाने उघडी दिसली. अशा एकूण आठ दुकानांवर दंडात्मक कारवाई केली. दरम्यान, या वेळी काही दुकानदार मात्र पथक पुढे जात असल्याची वाट पाहत मागे दुकाने उघडून ग्राहक करीत असल्याचेही चित्र दिसत होते. सकाळी ११ वाजता पालिका कार्यालयीन अधिक्षिका संघमित्रा संदानशिव यांच्या नेतृत्वाखाली पालिका पथक संचारबंदीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर कारवाईसाठी बाहेर पडले. यावेळी ज्यांची दुकाने उघडी होती ते ‘साहेब आले, पळा पळा, दुकाने बंद करा...’ असा आवाज एकमेकांना देत आपली दुकाने बंद करीत होते. हे पथक बाजारपेठेतून जसजसे पुढे जात तसे दुकाने बंद केली जात होती. मात्र ज्यांना दुकाने बंद करण्यास वेळ झाला, ज्यांनी दुकाने वेळेच्या आत बंद केली नाही, संचारबंदीत नियमांचे उल्लंघन केले, अशा आठ दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करीत चार हजारांचा दंड वसूल केला. ८ रोजी नेहमीप्रमाणे तलाव गल्लीच्या वळणावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती. चार चाकी वाहन धारक मध्ये बाजारपेठेत येत असल्याने ही वाहतुकीची कोंडी झाली होती. वास्तविक सकाळी ७ ते ११ या वेळे दरम्यान एकाही माल वाहतूक, अक्वा पाण्याचे जार वाहतूक करणारे चारचाकी वाहनांसाठी प्रवेश बंद ठेवला पाहिजे. जर त्याने बाजारपेठेत प्रवेश केला तर थेट पाच हजारांचा दंड वसूल करून कारवाई केली पाहिजे, अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख अधिक्षिका संघमित्रा संदानशिव, अभियंता अभिषेक काकडे, राहुल साळवे, पो.काँ.सुनील साळुंखे, अभिजित मुंदाणकर, हिम्मतराव पाटील, जितेंद्र चौधरी, रवींद्र पाटील, रमेश तीलकर, सचिन चौधरी, किरण खंडारे, विश्वास पाटील, विजय शिंपी आदी उपस्थित होते.