वासेफ पटेल
भुसावळ : महाराष्ट्र आणि पंजाब या दोन राज्यांना जोडणाऱ्या पंजाब मेल या सर्वात जुन्या रेल्वेला १ जून रोजी १०९ वर्षे पूर्ण झाली. काळानुरूप या रेल्वेने बदल स्वीकारले.
सुरुवातीला मुंबई ते पेशावर चालणाऱ्या पंजाब मेलची सुरुवात कुठून झाली याची मात्र माहिती नाही. उपलब्ध कागदपत्राच्या आधारे पंजाब मेल १ जून १९१२ रोजी बॅलार्ड पियर मोल स्थानकातून प्रथमच सुटल्याचा (सुरू झाल्याचा) अंदाज करण्यात आला आहे.
पंजाब मेल ही ग्लॅमरस फ्रंटियर मेलपेक्षा १६ वर्षे आधीपासून सुरू आहे. बॅलार्ड पियर मोल स्टेशन खरे म्हणजे जीआयपी रेल्वे सेवांसाठी एक केंद्र होते. पंजाब मेल किंवा पंजाब लिमिटेड तेव्हा तिला संबोधन केले जात होते. १ जून १९१२ रोजी ही मेल सुरू झाली. प्रारंभी, भारतात प्रथमच पोस्टिंग झालेले सरकारी अधिकारी त्यांच्या पत्नीसमवेत मेलमधून आणले जात होते. साऊथॅम्प्टन आणि बॉम्बे दरम्यान स्टीमरचा प्रवास तेरा दिवस चालायचा. ब्रिटिश अधिकारी मुंबईला जाण्यासाठी तसेच त्यांच्या पोस्टिंगच्या ठिकाणी रेल्वेने प्रवासासाठी एकत्रित तिकिटे घेत असत. त्यामुळे येथे आल्यावर ते मद्रास, कलकत्ता किंवा दिल्ली यापैकी एका रेल्वेगाडीने प्रवास करीत. मुंबईच्या बल्लार्ड पियर मोल स्थानकापासून ते पेशावरकडे जीआयपी मार्गे, सुमारे ४७ तासांत २४९६ किमी अंतर कापत असे. ट्रेनमध्ये सहा डब्यांचा समावेश होता. तीन प्रवाशांसाठी आणि तीन माल आणि टपालासाठी. तीन प्रवासी डब्यांतील प्रवाशांची क्षमता फक्त ९६ इतकी होती. सर्व डब्बे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाऊ शकणारे (कॉरिडॉर कार) होते आणि डबे प्रथम श्रेणीच्या, दोन बर्थ असलेल्या कंपार्टमेंटसह बनवले गेले होते. उच्च-श्रेणीतील प्रवाशांसाठी असल्याने गाड्यांमध्ये चांगल्या प्रकारच्या सुविधा असत. तसेच बाथरूम, एक रेस्टॉरंट कार, साहित्यासाठी डबा आणि एक डबा गोऱ्या साहेबांच्या नोकरांकरिता असे. स्वातंत्र्यपूर्व काळात पंजाब लिमिटेड ही ब्रिटिश भारतातील सर्वात वेगवान ट्रेन होती. पंजाब लिमिटेडचा मार्ग जीआयपी ट्रॅकवरून मोठ्या प्रमाणात जात होता आणि पेशावर छावणी येथे संपण्यापूर्वी इटारसी, आग्रा, दिल्ली आणि लाहोरमधून जात होता. १९१४ पासून या रेल्वेचे बॉम्बे व्हीटी (आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई) येथून प्रस्थान व आगमन होऊ लागले. त्यानंतर ही गाडी पंजाब लिमिटेड ऐवजी पंजाब मेल म्हणून ओळखली जाऊ लागली आणि याची दैनंदिन सेवा सुरू झाली. सन १९४५ मध्ये पंजाब मेलला वातानुकूलित डबा जोडण्यात आला.