लोकमत न्यूज नेटवर्क
चोपडा : महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेलगत मध्यप्रदेश हद्दीत असलेले उमर्टी या गावात गावठी कट्टे विक्रीचा व्यवसाय सध्या तेजीत आला असून या गावाचे कनेक्शन पंजाबसह भारतात देशभर असल्याचे सध्या बोलले जात आहे. देशभर गावठी पिस्तूल (कट्टे) पार्सल करणारे एक मोठे रॅकेट यातून कार्य कार्यरत असल्याचेही वृत्त पुढे आले आहे.
या ना त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील यापूर्वी अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यप्रदेश सीमेवर असलेल्या उमर्टी येथून गावठी कट्टे घेऊन जाताना विविध पोलीस स्टेशनमध्ये विविध आरोपी पकडले गेले आहेत. आता मात्र पंजाबमधील दोन युवक थेट उमर्टी येथे गावठी कट्टे घेण्यासाठी आले आणि एक नव्हे, दोन नव्हे तर चक्क सात गावठी कट्टे घेऊन जाताना चोपडा शहर पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.
देशभरातून गावठी कट्टे पार्सल करणाऱ्या रॅकेटमधील व्यक्ती या मध्यप्रदेश सीमेलगत असलेल्या उमर्टी येथे गावठी कट्टे घेऊन जाण्यासाठी किंवा येण्यासाठी चोपडा मार्गे जात असतात म्हणून सध्या चोपडा तालुक्याचे नाव देशभर या बाबतीत झळकत आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांची सीमा ठरवणाऱ्या अनेर नदीच्या मध्यप्रदेश कडील तीरावर उमर्टी या गावाची या गावठी कट्टे बनवण्याच्या बाबतीत ख्याती आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये गावठी पिस्तुल घेऊन जाण्याचे कनेक्शन सध्या कार्यरत झाले असून विविध ठिकाणी हाणामारी किंवा इतर घटना घडल्या की त्या ठिकाणी सहजतेने गावठी पिस्तुलचा वापर होत असतो. म्हणून हे गावठी पिस्तूल बनवणारे केंद्र मुळासकट उद्ध्वस्त करण्याची सध्या गरज आहे अन्यथा या गावठी पिस्तूलचा वापर यापुढे सर्रास गैरवापर होऊन नको त्या घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या दोन महिन्यापूर्वी चोपडा तालुक्यात वाळूमाफियामध्ये झालेल्या वादात सर्रासपणे गावठी पिस्तूल वापरला गेल्याची घटना समोर आली आहे. यासह महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्येही गावठी पिस्तूल वापरण्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्याचे विविध माध्यमातून समोर आलेले आहे.
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सीमेलगत असलेल्या या गावठी पिस्तूल निर्मितीच्या केंद्रात पाच हजार रुपयापासून ते सात हजार रुपयांपर्यंत विविध प्रकारचे गावठी पिस्तूल विक्री होत असल्याचेही यापूर्वी अनेकवेळा समोर आलेले आहे. महाराष्ट्रातील पोलीस गावठी कट्टे घेऊन जाणाऱ्यांना सातत्याने सापळा रचून पडत असतात; परंतु मध्यप्रदेशमध्ये सर्रासपणे गावठी पिस्तूल तयार होऊन विक्री होत असेपर्यंत येथील पोलिसांच्या ही घटना लक्षात येत नसावी, ही एक शोकांतिका आहे. म्हणून महाराष्ट्र पोलीस आणि मध्यप्रदेश पोलीस यांनी हा अड्डा उद्ध्वस्त करण्यासाठी हातात हात घालून काम करण्याची गरज आहे. गावठी पिस्तूल कुठून आणले, याबाबतीत आरोपींकडून माहिती मिळत असली तरी थेट मुळाशी जाण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांना मध्यप्रदेश पोलिसांचे फारसे सहकार्य मिळत नसल्याचे अनेकवेळा पोलिस विभागाकडून बोलले जाते.