अतिवृष्टीमुळे कापसाचे उत्पन्न घटले: यंदा मात्र लागवडीचे क्षेत्र वाढणार
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या वर्षीच्या हंगामात अतिवृष्टीमुळे कापसाच्या उत्पादनात २५ टक्के घट झाल्याने, जिल्ह्यात १५ लाख गाठींची खरेदी झाली असल्याची माहिती कॉटन क्षेत्रातील तज्ज्ञ हर्षल नारखेडे यांनी दिली. गेल्या वर्षी कोरोनामुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे कापसाची खरेदी होऊ शकली नव्हती. मात्र, या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच जिल्ह्यातील ९० टक्के कापसाची शासकीय शासकीय खरेदी केंद्रावर खरेदी झालेली होती.
जिल्ह्यात कापसाला सर्वाधिक भाव ६,५०० प्रति क्विंटल इतका भाव एप्रिल महिन्यात मिळाला, तर सर्वात कमी भाव पाच हजार प्रति क्विंटल इतका भावही कमी दर्जाच्या कापसाला मिळाला होता. मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सेंटचे दर वाढल्याने कापसाच्या दरातही चांगली वाढ झाली होती. दरम्यान, पुढील हंगामात आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाची मागणी जास्त राहण्याची शक्यता कॉटन क्षेत्रातील जाणकारांनी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कापूस लागवड क्षेत्रात यंदाही पाच टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यंदा कापसावर गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भाव कमी राहण्याची शक्यता असून, पावसाची स्थिती चांगली राहिल्यास, या वर्षी विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ५ लाख २० हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती. या वर्षी ५ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड होण्याची शक्यता आहे.