लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात रब्बीचे जवळजवळ ९० टक्के पीक काढण्यात आले असून, लवकर जिल्ह्यात शासकीय खरेदीला सुरुवात होणार आहे. हरभऱ्याच्या खरेदीला जिल्ह्यात सुरवात झाली असून जिल्ह्यातील १४ केंद्रांवर आतापर्यंत २९ हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी जी.एन. मगर यांनी दिली आहे. तसेच गहू, मका व दादरच्या शासकीय खरेदीला देखील लवकरच सुरुवात होणार असून, यासाठी जिल्ह्यात १६ केंद्रांवर नोंदणी सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
जिल्हा मार्केटिंगतर्फे शासकीय खरेदीस लवकरच सुरुवात होणार असून , जिल्ह्यातील १६ केंद्रांवर नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. ३० एप्रिल पर्यंत नोंदणी सुरु राहणार आहे. शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी सातबाराचा उतारा, आधार कार्ड व बँकेचे पासबुक हे जमा करायचे आहे. जळगाव तालुक्यातील नोंदणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू आहे. तर इतर तालुक्यांमध्ये जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रांवर व बाजार समित्यांमध्ये देखील ही नोंदणी सुरू असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी दिली आहे. यंदा हरभऱ्याला चांगला भाव मिळाला असून, जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रावर ५१०० रुपये प्रति क्विंटल या दराने हरभऱ्याची खरेदी केली जात आहे. शासकीय खरेदी केंद्रांवर चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे खाजगी बाजारापेक्षा शासकीय खरेदी केंद्रावर आपला माल विक्री करण्यास प्राधान्य दिसून येत आहे.
शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर व्यापाऱ्यांकडून केली जाते विक्री
दरवर्षी शासनाकडून रब्बी पिकांच्या खरेदीला उशीर केला जात असतो, यामुळे अनेक शेतकरी आपला माल निघाल्यानंतर व्यापाऱ्यांकडे विक्री करत असतात, रब्बी हंगामाच्या काढणीला सुरुवात झाल्यानंतर जर शासनाने खरेदीला सुरुवात केली तर शेतकरी आपला माल थेट शासकीय खरेदी केंद्रावर आणू शकतात. मात्र शासन अजूनही याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येते, हरभऱ्याची खरेदी जरी सुरू असली तरी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या नावावर अनेक व्यापारी आपला माल विक्री करत असल्याचीही माहिती अनेक शेतकऱ्यांनी दिली आहे. ज्या शेतकऱ्यांनी आधी खासगी व्यापाऱ्यांना ४५०० रुपये दराने हरभऱ्याची विक्री केली होती. आता तेच व्यापारी शेतकऱ्यांचे उतारे घेऊन ५१०० रुपये दराने आपला माल शासकीय खरेदी केंद्रावर विक्री करत आहेत. दरवर्षी हा प्रकार सुरू असून याबाबत शासन किंवा प्रशासन देखील कोणतेही लक्ष घालायला तयार नाही. जर रब्बी हंगाम काढायला सुरुवात झाली तेव्हाच शासकीय खरेदी केंद्र सुरू झाले तर अशा प्रकारांना आळा बसू शकतो.
दादरची कवडीमोल भावात केली जातेय खरेदी
सध्या दादरला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ३१०० रुपये प्रति क्विंटल इतका भाव निश्चित केला आहे. मात्र हा भाव निश्चित केला असला तरी बाजार समितीमध्ये दादरला केवळ २२०० ते २३०० रुपये इतका दर मिळत असून, त्यातही कट्टी कापून घेतली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. विशेष म्हणजे बाजार समिती प्रशासनाने गेल्या महिन्यात शेतकऱ्यांनी केलेल्या गोंधळानंतर दादरला ३१०० रुपये इतका भाव निश्चित केला होता. मात्र व्यापाऱ्यांकडून अजूनही शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव दिला जात नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तसेच याबाबतीत बाजार समिती प्रशासनाकडून देखील कोणतीही कारवाई केली जात नसल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.