लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर जळगावात शिवसेनेने भाजप कार्यालयाला लक्ष्य करत तोडफोड करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी शिवसैनिकांनी कोंबड्या फेकत आंदोलन केले होते. यानंतर शुक्रवारी भाजपच्या वतीने बळीराम पेठ येथील वसंतस्मृती कार्यालयात होमहवन करत कार्यालयाचे शुद्धीकरण करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या कृतीचा निषेधही करण्यात आला.
भाजपा महिला मोर्चा व अध्यात्मिक आघाडीतर्फे वसंतस्मृती कार्यालयाचा शुद्धीकरण कार्यक्रम करण्यात आला. यावेळी महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी , भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष उज्वला बेंडाळे यांच्या नेतृत्वात अध्यक्षा दिप्ती चिरमाडे, महिला सरचिटणीस रेखा वर्मा, सरोज पाठक, जिल्हा पदाधिकारी रेखा कुलकर्णी, महिला आघाडीच्या पूजा चौधरी, तृप्ती पाटील, सरचिटणीस उदय परदेशी ,सरस्वती मोरे, शर्वरी मोरे, ज्योती बर्गे यांच्यासह नगरसेवक विशाल त्रिपाठी, महेश जोशी, नितीन इंगळे, विधानसभा क्षेत्र दिपक साखरे, ओबीसी आघाडी अध्यक्ष जयेश भावसार, युवा मोर्चाचे अध्यक्ष आनंद चौधरी व कार्यालय मंत्री यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेनेच्या कृतीचा केला निषेध
मंत्रोपच्चाराने याठिकाणी होमहवन करण्यात आले. तसेच संपुर्ण कार्यालयात पाणी शिंपडण्यात आले. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेने हिंदू धर्मियांचा पवित्र समजल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यात भाजप कार्यालयात कोंबड्या फेकण्याच्या कृतीचाही निषेध व्यक्त करण्यात आला. अध्यात्मिक शांती करून संपुर्ण कार्यालयाचे शुध्दीकरण करण्यात आले. सेनेच्या कृतीचा निषेध करावा तेवढा कमीच असून, केवळ प्रसिध्दीसाठी सेनेकडून करण्यात आलेला खटाटोप होता. तसेच भाजप कार्यालयावर एकप्रकारे भ्याडच हल्ला केला होता असे महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी यांनी यावेळी सांगितले.