जळगाव जामोद : रविवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्णा नदीला मोठा पूर आला असून त्यामुळे जळगाव जामोद-नांदुरा वाहतूक सोमवारी दुपारी पाच वाजतापासून बंद झाली. तर जळगाव जामोद-संग्रामपूर- शेगाव मार्ग कालखेड जवळ असलेल्या नाल्याला पूर असल्यामुळे सकाळपासूनच बंद आहे. जळगाव जामोद येथून बुलढाणा, अकोला आणि शेगाव जाण्यासाठीचे सर्व मार्ग बंद झाले. या दोन्ही तालुक्याचा संपर्क तुटला आहे.
जळगाव नांदुरा मार्गावरील मानेगाव येथे पूर्णा नदीच्या पुलावर बांधलेला पूल गेल्या चार वर्षापासून शोभेची वस्तू बनला आहे. दरवर्षी प्रवाशांना वाटते या पावसाळ्यात तरी हा पूल चालू होईल. परंतु अद्यापही हा पूल सुरू होण्याचा झालेला नाही. त्यामुळे पूर्णा नदीला पूर आला म्हणजे इंग्रजकालीन पूल पुराखाली जातो आणि वाहतूक ठप्प होते. हिच परिस्थिती सोमवारी निर्माण झाली आहे. प्रवाशांना अकोला किंवा बुलढाणा जायचे असल्यास मुक्ताईनगर मलकापूर मार्गे जावे लागणार आहे. त्यासाठी त्यांना प्रवास भाड्याचा आर्थिक भुर्दंड सुद्धा सोसावा लागतो. पूर्णा नदीला पुलावरून पाणी असताना कोणीही वाहनधारक त्यावरून जाऊ नये, यासाठी पुलावर जळगाव जामोद पोलिसांच्यावतीने बंदोबस्त लावण्यात आला आहे.
रूग्ण महिलेला बैलगाडीचा आधार, टाकळीपंच संपर्क तुटला! पातुर्डा : जवळच्या टाकळीपंच येथील मोरवा नाल्याच्या पुलावरून पाणी असल्याने या पूर्णाकाठच्या गावाचा संपर्क तुटलेला आहे. रात्री उशीरापर्यत पाणी उतरले नव्हते. सोमवारी पातुर्डा येथे आठवडी बाजार असतो. नागरिकांना बाजारात येता आले नाही. या दरम्यान रूग्णांना त्रास झाला. गावातील शीला झाडोकार यांना अचानक दुखण्याचा त्रास झाला. त्यामुळे त्यांना बैलगाडीतून शेत रस्त्याने कोद्री मार्गे पातुर्डा येथे दवाखान्यात न्यावे लागले. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे दिसून आले. पूर्णा नदीला पुर वाढण्याची परिस्थीती असल्याने गावात भीतीचे वातावरण आहे.