लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : चोपडा येथील शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील तसेच जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्षा इंदिरा पाटील यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी त्यांच्या समर्थकांनीही हातावर घड्याळ बांधले. दरम्यान, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्याशी असलेल्या मतभेदांमुळे पक्ष सोडल्याचे स्पष्टीकरण कैलास पाटील यांनी दिले आहे.
राष्ट्रवादी कार्यालयात शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार डॉ. सतीश पाटील, जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे, माजी आमदार संतोष चौधरी, माजी आमदार दिलीप वाघ आदिंची व्यासपीठावर उपस्थिती होती. माजी आमदार कैलास पाटील यांनी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांचा पराभव करून चोपड्यातून विजय मिळविला होता. २००९ साली हा मतदार संघ अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला होता. तर इंदिरा पाटील या जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्षा, माजी जि.प. या पदांवर कार्यरत होत्या.
काय म्हणाले कैलास पाटील?
माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्याशी असलेल्या मतभेदामुळे नगरपालिकेची दहा वर्षाची सत्ता गेली तसेच विविध संस्थांवरील वर्चस्व नष्ट झाले. याबाबत आम्ही जिल्ह्याच्या नेत्यांकडे तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यथा मांडल्या. तालुक्याचे वैभव असणाऱ्या सूतगिरणीच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अचानक येणे रद्द केले, मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी होती व काम कोणाकडून करायचे हा संभ्रम होता. त्यानंतर सर्वांशी चर्चा करून आपण आज राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे माजी आमदार कैलास पाटील यांनी स्पष्ट केले.
तयारी करून ठेवलेली बरी : भुजबळ
मी निर्दोष असल्याचा पक्षाला विश्वास होता त्यामुळे मला मंत्री म्हणून पक्षाने स्थान दिल्याचे छगन भुजबळ यावेळी म्हणाले. आता शिवसेनेसोबत युती असली तरी भविष्यात ती होईल की नाही हे सांगता येत नाही. त्यामुळे तयारी करून ठेवलेली बरी असेही ते यावेळी म्हणाले. एकेकाळी जळगाव राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. एक दिलाने काम करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.