चंद्रशेखर जोशीजिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात सध्या एकमेकांना आव्हान देण्याची जणू स्पर्धाच सुरू आहे. लवकरच लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ही आव्हाने अधिकच आक्रमक होत असल्याचे लक्षात येते. भाजपाच्या एका कार्यक्रमात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मित्र पक्षातील सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे नाव घेऊन ते नेहमीच लंगोट बरोबर घेऊन फिरणारे पहेलवान असल्याचे उद्गार काढले. तर त्याला गुलाबराव पाटील यांनी पक्षाच्या जिल्हा पदाधिकाºयांच्या बैठकीत उत्तर दिले. आम्ही लंगोट बरोबर घेऊन नाही बांधून फिरतो. कुस्तीसाठी आम्ही केव्हाही तयार असतो. एवढे बोलून न थांबता त्यांनी एक चिमटा घेतला तो असा की, आम्ही गादीवर कुस्ती खेळणारे पहेलवान नाही तर मातीत कुस्ती खेळतो. त्यांनी घेतलेला हा चिमटा राजकीय क्षेत्रात चर्चेचा ठरला. जिल्ह्यातील शिवसेना नेते मंडळी व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यातील सख्य सर्वांनाच परिचित आहे. शिवसेना-भाजपातील गुलाबराव पाटील व गिरीश महाजन हे दोन नेते सहसा एकमेकांच्या वाटेला जात नाहीत. कारण राजकारणात सद्य स्थितीत दोघे नाराज आहेत ते एकाच नेत्याविरूद्ध त्यामुळे वेगळ्या पक्षात असले तरी एकमेकांशी या दोहोंनी नेहमीच जुळवून घेतले आहे. दोघेही सहसा एकमेकांना डिवचतांना दिसत नाही. मात्र सध्या राजकीय आखाडे तापू लागले आहेत. त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. एकमेकांना आव्हाने देणे सुरू झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या १५ फेब्रुवारी रोजी जिल्हा दौºयावर येत आहेत. त्यांचा हा दौरा सांकेतीक आहे. जळगाव लोकसभा मतदार संघाची जागा ही शिवसेनेला हवी आहे. पक्षाने माजी आमदार आर.ओ.पाटील यांना या मतदार संघातून उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित केले आहे. आर.ओ.पाटील यांनीही निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे यांचा हा दौरा दुष्क ाळाने होरपळलेल्या शेतकºयाच्या दुखावर फुंकर घालण्यासाठी असल्याचे पक्षातील काही नेते मंडळी म्हणत असली तरी लोकसभेच्या प्रचाराचा खान्देशातून प्रारंभ होण्याचेच संकेत यातून मिळत आहेत. आर.ओ.पाटील हे तर जय्यत तयारीत आहेत. कोणत्याही परिस्थितीत जळगावची जागा शिवसेनेकडे घ्यायची असेच प्रयत्न या पक्षाकडून सुरू आहेत. त्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू असल्याचेच लक्षात येते.
पहेलवान आणि आव्हाने...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 4:22 PM