जळगाव- पिंप्राळ्यातील रथ चौक परिसरात असलेल्या केसरीनंदन हनुमान मंदिरातील दान पेटी अज्ञात चोरट्याने फोडून दोन ते तीन हजार रूपयांची रोकड लंपास केल्याची घटना रविवारी सायंकाळी ७.३० वाजता उघडकीस आली आहे.पिंप्राळा येथील रथ चौक परिसरात केसरीनंदन हनुमान मंदिर आहे. या मंदिरात हनुमानाच्या मूर्तीजवळच दानपेटी ठेवलेली आहे. दरम्यान, रविवारी दुपारच्या सुमारास कुणीतरी अज्ञात चोरट्याने ही दानपेटी फोडून त्यातील दोन ते तीन हजार रूपयांची रोकड लंपास केली. या मंदिरात सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास नियमित आरती होते. त्यामुळे रविवारी सायंकाळी सुध्दा आरतीसाठी परिसरातील तरूण मंदिरात आल्यावर त्यांना दानपेटी फुटलेली दिसून आली. दरम्यान, सकाळी दानपेटी सुरक्षित होती़ त्यामुळे दुपारीच कुणीतरी चोरी केली असावी, असा संशय तरूणांकडून वर्तविण्यात आला. शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांकडून बंद घरे तर टार्गेट केली जात आहे, मात्र भरदिवसा सुध्दा घरफोड्या केल्या जात आहेत. आता तर मंदिरातील दानपेट्या फोडण्यापर्यंत चोरट्यांनी मजल मारली आहे.