लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - ग.स.सोसायटीच्या निवडणुका केव्हाही जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुका जशा जवळ येत आहेत. त्याच प्रमाणे ग.स.तील राजकारण देखील तापू लागले आहे. गेल्या महिन्यात अध्यक्ष मनोज पाटील यांच्याविरोधात सत्ताधारी लोकसहकार व सहकार गटाने एकत्रित येवून, राजीनामे देत ग.स.सोसायटीवर प्रशासक नेमला होता. आता अध्यक्ष मनोज पाटील यांनी ग.स.तील नोकर भरतीत दिलेल्या बनावट आदेशाबाबत माजी अध्यक्ष विलास नेरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीसांकडून तपास सुरु असला तरी ग.स.तील राजकारण पोलिसांपर्यंत पोहचले असून, निवडणूक जवळ येईपर्यंत ग.स.तील अनेक प्रकरणे बाहेर येण्याची शक्यता आहे.
ग.स.सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम काही महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधीच जानेवारी महिन्यात सत्ताधारी लोकसहकार गटातील ४ संचालकांसह विरोधी असलेल्या सहकार गटातील १० अशा एकूण १४ संचालकांनी आपले राजीनामे जिल्हा उपनिबंधकांकडे सादर करत सर्वच संचालकांनी अध्यक्ष मनोज पाटील यांच्या विरोधात मोर्चा उघडला होता. त्याचा बदला घेत आता मनोज पाटील यांनीही ग.स.सोसायटीत झालेल्या कर्मचारी भरतीत विजय पाटील या कर्मचाऱ्याचा नियमित वेतन श्रेणीच्या बनावट आदेश काढल्याप्रकरणी विलास नेरकर व तत्कालीन व्यवस्थापक संजय ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहेत.
सहकारमधून लोकसहकार आता लोकसहकारमध्येही फुट
ग.स.मध्ये सहकार गटाने २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत एकहाती सत्ता आणली होती. मात्र, सत्तेला चार वर्ष पुर्ण झाल्यानंतर दीड वर्षांपुर्वी अध्यक्ष निवडीच्या वेळेस सहकार गटात मोठी फुट पडली होती. २१ पैकी ११ सदस्यांनी मिळून लोकसहकार गट स्थापन केला होता. १० सदस्य सहकार गटात कायम राहिले होते. त्यामुळे ग.स.च्या निवडणुकीत सहकार विरुध्द लोकसहकार गटात चुरस पहायला मिळेल अशी शक्यता असतानाच सहकार गटातील ९ सदस्यांसोबत लोकसहकार गटाच्या ५ सदस्यांनी देखील अध्यक्ष मनोज पाटील यांच्या कार्यपध्दतीवर नाराज होवून राजीनामे दिले होते. त्यामुळे लोकसहकार गटात देखील फुट पडली होती. आता लोकसहकार गटाचे प्रमुख विलास नेरकर यांच्यावरच गुन्हे दाखल झाल्याने ग.स.च्या निवडणुकीत आणखी एक गट तयार होण्याची शक्यता आहे.