जळगाव : जैन उद्योग समुहाच्या शिरसोली रस्ता व बांभोरी येथील तीन कंपन्यांसह देशभरातील आस्थापनांची प्राप्तीकर विभागाच्या १०० ते १५० अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पथकाने गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास एकाच वेळी तपासणी सुरु केली. या समूहाचा आर्थिक व्यवहार असलेल्या महावीर सहकारी बँक तसेच त्यांच्याशी संबंधित असलेले व्यावसायिक राजा मयूर, डॉ.सुभाष चौधरी यांच्यासह सीए, अकाउंटंट अशा २६ ठिकाणी एकाचवेळी तपासणीसत्र सुरू होते. रात्री उशिरापर्यंत काही ठिकाणी ही तपासणी सुरूच होती.जैन उद्योग समुहाचे जळगावात मुख्यालय आहे. ठिबक सिंचन, टिश्यू कल्चर, पाईप, फळ व कृषीमालावरील प्रक्रिया, मसाले अशी त्यांची विविध उत्पादने आहेत. देश-विदेशात या समूहाचा विस्तार आहे. कंपनीच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात तपासणी सत्र राबविले जात आहे.एकाच वेळी तपासणीगुरुवारी दुपारी जैन उद्योग समुहाच्या जळगावातील बांभोरी येथील जैन पाईप, शिरसोली रस्त्यावरील जैन हिल्स, फूड पार्क यासह देशभरातील समुहाच्या सर्वच कार्यालयांची तपासणी सुरु करण्यात आली. त्या ठिकाणी विविध खाते, संगणक, वेगवेगळे रेकॉर्ड, उत्पादन आणि पुरवठा याच्याशी संबंधित नोंदी यांची तपासणी करण्यात येत होती. या पथकात नागपूर, नाशिक, औरंगाबाद, पुणे, अकोला येथील अधिकाºयांचा समावेश आहे.तपासणीचे नेमके कारण समजले नसले तरी गेल्या वर्षापासून कंपनीची आर्थिक स्थिती बिकट आहे. विविध राज्यात उद्योगसमूहाने घेतलेल्या कंत्राटांचा पैसा सरकारकडे अडकून पडला आहे. नुकत्याच समाप्त झालेल्या तिमाही अहवालातही तोटा झाल्याचे कंपनीने नमूद केले होते. त्यात कराविषयी तपासणी करण्यासाठीे प्राप्तीकर विभागाने कंपनीसह त्यांच्याशी संबंधित आस्थापना, सीए, अकाउंटंट, आर्थिक व्यवहार असलेली महावीर सहकारी बँक यांची कसून तपासणी केली. काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरु होती.समुहाशी संबंधित आस्थापना, व्यक्तींकडेही तपासणीसमूहाचे चेअरमन अशोक जैन यांचे सुयोग कॉलनीतील निवासस्थानीदेखील तपासणी सुरु होती. जैन उद्योग समुहाशी संबंधित शिवाजीनगरातील राजा मयूर यांच्या राजा ट्रॅक्टर या फर्ममध्येही चार ते पाच जणांचे पथक पोहचले. तेथे देखील कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. प्राप्तीकर अधिकाºयांच्या पथकासोबत महिला व पुरुष पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते.डॉक्टरांकडे ठाण मांडूनया समूहाशी संबंधित वैद्यकीय व्यावसायिक डॉ. सुभाष चौधरी यांच्या प्रतापनगरातील रुग्णालयातही चार ते पाच जणांचे पथक रात्रीपर्यंत तपासणी करीत होते. या ठिकाणी संंबंधित अधिकाºयांशी चर्चा केली असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. आतमध्ये पथकाकडून तपासणी सुरू असल्याने डॉक्टर स्वागतकक्षात येऊन रुग्णांची तपासणी करीत होते.तपासणी की छापे?एकाचवेळी २६ ठिकाणी प्राप्तीकर विभागाची कार्यवाही सुरु असल्याने हे तपासणी सत्र आहे की, छापे याविषयी करसल्लागार आणि उद्योग विश्वात संभ्रम दिसून आला. जैन उद्योग समूहाच्या जनसंपर्क विभागानेही यासंबंधी बोलण्यास असमर्थता व्यक्त केली.स्थानिक अधिकाºयांना ठेवले दूरया तपासणीदरम्यान प्राप्तीकर विभागाच्या जळगावातील अधिकाºयांना दूर ठेवण्यात आले. एकही स्थानिक अधिकारी पथकात नव्हता. किमान दोन ते तीन दिवस ही तपासणी सुरु राहणार असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, पथकातील काही अधिकाºयांनी संध्याकाळी जळगावातील बी.जे.मार्केटमधील प्राप्तीकर विभागाच्या कार्यालयात पोहोचून स्थानिक अधिकाºयांना कार्यालयात थांबू न देता त्यांनीच कार्यालयाचा ताबा घेतला.बाहेरील वाहनांचा ताफापथक जळगावात आले तरी स्थानिक एकही वाहन त्यांच्याकडे नव्हते. वेगवेगळ्या विविध जिल्ह्यांची पासिंग असलेली वाहने तपासणी होत असलेल्या ठिकाणी उभे होते.एका सुवर्ण पेढीवरदेखील दोन अधिकाºयांनी चौकशी केली. मात्र काही संशयास्पद न आढळल्याने अधिकारी निघून गेले व या पेढीतील व्यवहार सुरळीत सुरू होते.कमालीची गुप्तताया तपासणीबाबत दुपारी सर्वत्र चर्चा सुरू झाली. मात्र प्रत्यक्ष अधिकारी, कंपनीसह तपासणी झालेल्या सर्वच ठिकाणी कमालीची गुप्तता पाळण्यात येत होती. त्यामुळे या तपासणीत काय आढळून आले हे अधिकृतपणे कळले नाही.
जैन उद्योग समुहाच्या देशभरातील आस्थापना ‘प्राप्तीकर’च्या रडारवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 12:12 PM