नाशिकच्या जीएसटी पथकाने ३ मार्च रोजी पहूर येथील प्रवीण कुमावत यांच्या वेदांत मेडिकलवर धाड टाकल्यावर त्यांची कृष्णा स्टील नावाने असलेल्या कंपनीचे जीएसटी थकले असल्याचे सांगण्यात आले. मात्र, आपली कुठलीही कंपनी नसल्याचे त्यांनी पथकाला सांगताच फसवणुकीचा प्रकार समोर आला. या प्रकरणात पथकाने पहूर येथून कैलास भारुडे व जळगावातून पिंटू इटकरे यांना ताब्यात घेतले. आपली फसवणूक झाल्याचे कळताच प्रवीण कुमावत व त्यांचे मित्र अशोक सुरवाडे यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार अर्ज दिला आहे. आता ही तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आली आहे. तक्रारीतील आशय, कंपनीचे कार्यालय, त्यांचे कार्य, पदाधिकारी कोण यासह इतर माहिती संकलित केली जाणार आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण सोपविण्यात आले, म्हणजे त्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यताही अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. यात दोन तक्रारदार पुढे आलेले असले तरी प्रत्यक्षात आणखी अनेकांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे.
दरोड्याची सर्वांगाने चौकशी
इटकरे याच्याकडे ३ फेब्रुवारी रोजी काही शस्त्रधारी लोकांनी दरोडा टाकून २३ लाखांचा ऐवज लुटून नेला होता. याबाबत रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या दरोड्याचा पोलिसांनी सर्वांगाने तपास केला, एकही शक्यता किंवा बाजू सोडली नाही. सर्वच बाबी पडताळण्यात आलेल्या आहेत. बांबरुड येथेही इटकरेच्या नातेवाइकाकडे चौकशी झाली, मात्र कुठेच काही धागादोरा मिळत नसल्याने पोलिसांना त्यात वेगळीच शंका येऊ लागली आह, आता त्याच अंगाने तपास वळविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोट..
पिंटू इटकरे याच्याविरुध्दची तक्रार नुकतीच प्राप्त झालेली आहे. सध्या रजेवर असल्याने अजून चौकशी केलेली नाही. या प्रकरणाचा बारीक अभ्यास करुन सत्य शोधले जाईल. त्यात जे काही निष्पन्न होईल, त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.
-बळीराम हिरे, पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा