जळगाव : सध्या राज्यात लम्पी या आजाराने ३२ जनावरांचा तर जिल्ह्यात १२ गुरांचा मृत्यू झाला आहे. मात्र पाहणी दौऱ्यानंतर लक्षात आले की अधिकारी आकडेवारी देण्यासाठी कार्यालयातच बसून असतात. त्यामुळे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या दारात जाऊन पाहणी करावी आणि औषधोपचार व इतर मदत करावी, अशा शब्दांत राज्याचे महसूल आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कानउघडणी केली. नियोजन भवनात पशुसंवर्धन विभागाची आढावा बैठक पार पडली.
या बैठकीला जळगाव, धुळे आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते. त्यात त्यांनी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याच्या सूचना देखील केल्या. या बैठकीला आमदार एकनाथ खडसे, खासदार उन्मेश पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार शिरीष चौधरी, आमदार सुरेश भोळे, आमदार अनिल पाटील, आमदार लता सोनवणे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया आणि महापालिका आयुक्त विद्या गायकवाड उपस्थित होते.
दरम्यान, आमदार अनिल पाटील यांनी सुरूवातीलाच जिल्ह्यात फक्त १२ पेक्षा जास्त जनावरांचा लम्पी आजाराने मृत्यू झाला असूनही आकडा कमी असल्याचा दावा केला. त्यावर नंतर बोलतांना माजी मंत्री एकनाथ खड़से यांनीही दुजोरा दिला. खडसे यांनी सांगितले की, एकट्या न्हावी गावात १२ पेक्षा जास्त जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हा आकडा योग्य वाटत नाही. तर खासदार उन्मेश पाटील यांनी जिल्ह्यात जनावरांच्या सुरक्षिततेसाठी आणि शेतकऱ्यांना लाभ व्हावा, यासाठी शासनाच्या योजना एकत्रित करून त्याची मदत पुरवण्याची सुचना केली.
लोकप्रतिनिधींच्या या सुचनानंतर बोलताना विखे पाटील म्हणाले की, सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंचनामे तातडीने करणार. तसेच जनावरांचे लसीकरणही केले जाईल. शेतकऱ्यांना त्यासाठी कोणताही खर्च करावा लागणार नाही याची दक्षता घेतली जाईल. औषधेही शासनाकडूनच दिली जाणार आहेत. अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून आकडेवारी टाकत बसू नये, तातडीने पंचनामे करावेत तसेच उणिवा दूर केल्या जाव्यात. जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार बंद करण्यात आले आहेत. काही काळासाठी जनावरांची आंतर तालुका वाहतुकही बंद करण्यात आली आहे. जनावरांच्या विम्याबाबतही विचार केला जाईल. शासनाकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने १० हजार रुपये दिले जाणार आहेत. उर्वरीत आणखी मदत करण्याचा विचार केला जाईल. तसेच जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या कामावर असमाधानी आहोत. अधिकाऱ्यांनी शासनाला अहवाल देण्यासाठी इतरांना बसवावे, अधिकाऱ्यांनी फिल्डवर गेलेच पाहिजे., अशा शब्दात त्यांनी ठणकावले.
नैसर्गिक आपत्ती घोषित करा - खडसेराज्यात लम्पी या आजाराला नैसर्गिक आपत्ती घोषित करावी, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली. त्यामुळे शेतकऱ्यांना ३५ हजार रुपये मदत मिळु शकते. तसेच न्हावीला जनावरे पुरण्यासाठी शेतकऱ्यांनाच खर्च करावा लागत आहे. त्यामुळे लम्पीने मृत झालेल्या जनावरांना पुरण्यासाठी तातडीने जिल्हा प्रशासनाने मदत करावी, असेही खडसे यांनी सांगितले. जळगावला पशु वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्तावाला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. त्याकडेही तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.