ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.9 - सार्वजनिक जागी आरडाओरड करणे शहरातील उच्चभ्रू कुटुंबातील चार तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. स्वपAील अशोक परदेशी (रा.इंद्रप्रस्थ नगर, जळगाव), जितेंद्र ज्ञानेश्वर अत्तरदे (रा.श्रध्दा कॉलनी, जळगाव), राहूल शरद तायडे (रा.पारख नगर, जळगाव) व सागर दिलीप पिंगळे (रा.व्यंकटेश नगर, जळगाव) या तरुणांना न्यायालयाने प्रत्येकी 1200 रुपये दंडाची शिक्षा केली.
रमजान सणानिमित्त पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी शहरात पोलिसांची गस्त वाढविली आहे. रामानंद नगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बी.जी.रोहम व गुन्हे शोध पथक बुधवारी गस्तीवर असताना रात्री साडे दहा वाजता न्यायाधीश निवासस्थान परिसरात असलेल्या सानेगुरुजी मैदानावर जोरजोरात आरडाओरड व विभत्स कृत्य करताना आढळून आले.
निरीक्षक रोहम यांनी चौघांना ताब्यात घेवून चौकशी केली असता ते उच्चभ्रू कुटुंबातील असल्याचे स्पष्ट झाले. या चौघांवर कारवाई करुन त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्या.बी.डी.गोरे यांनी या चारही तरुणांना 1200 रुपये दंड ठोठावून समज देवून सुटका केली.