सुविधा : जळगावला थांबा असल्याने प्रवाशांची गैरसोय टळणार
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी येत्या १६ एप्रिलपासून गांधीधाम - पुरी, पोरबंदर - संत्रागाची व राजकोट ते रेवा दरम्यान विशेष साप्ताहिक गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व साप्ताहिक गाड्यांना जळगाव स्थानकावर थांबा देण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय टळणार आहे.
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनातर्फे मर्यादित गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, गेल्या महिनाभरापासून प्रवाशांची प्रचंड गर्दी असल्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून १६ एप्रिलपासून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. यामध्ये दर शुक्रवारी (गाडी क्रमांक ०९४९३) गांधीधाम ते पुरी दरम्यान धावणार असून, परतीच्या प्रवासासाठी (गाडी ०९४९४) ही दर सोमवारी पुरीहून गांधीधामकडे रवाना होणार आहे. तसेच १६ एप्रिल रोजीच पोरबंदर ते संत्रागाची दरम्यान (गाडी क्रमांक ०९०९३) दर शुक्रवारी धावणार असून, परतीच्या प्रवासासाठी (गाडी क्रमांक ०९०९४) ही संत्रागाचीहून दर रविवारी पोरबंदरकडे रवाना होणार आहे. त्यानंतर राजकोट ते रेवा दरम्यान ११ एप्रिल रोजी (गाडी क्रमांक ०९२३७) ही दर रविवारी धावणार आहे तर परतीच्या प्रवासासाठी (गाडी क्रमांक ०९२३८) ही दर सोमवारी रेवाहून राजकोटकडे रवाना होणार आहे. दरम्यान, या सर्व साप्ताहिक गाड्यांना जळगावला थांबा देण्यात आला असून, गाड्यांच्या वेळाबाबत रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
इन्फो :
तिकीट आरक्षित असणाऱ्या प्रवाशांनाच प्रवेश
रेल्वे प्रशासनातर्फे सुरू करण्यात येणाऱ्या या साप्ताहिक गाड्यांनाही तिकीट आरक्षण सक्तीचे केले आहे. तिकीट आरक्षित असेल तरच गाडीत प्रवेश देण्यात येणार आहे. या गाड्यांना जनरल तिकीट बंद करण्यात आले आहे. त्यामुळे जे प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळतील, त्यांच्यावर रेल्वे प्रशासनातर्फे कडक कारवाई करण्यात येणार आहे.
इन्फो :
कुशीनगर एक्स्प्रेस तीन दिवस बंद
कुशीनगर एक्स्प्रेसचा १३ एप्रिलपासून गाडी क्रमांक बदलणार असल्याने, रेल्वे प्रशासनातर्फे ही गाडी ९ ते १२ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे, अशी माहिती भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे कळविण्यात आली असून, ही गाडी यापुढे सुपरफास्ट एक्स्प्रेस म्हणून धावणार असल्याचेही रेल्वे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.