कोरोना परिणाम : रेल्वेकडून बैठकीचे नियोजन होत नसल्याने प्रवाशांच्या समस्या मार्गी लागेना
कोरोनाचा फटका : रेल्वेकडून बैठकीचे नियोजन होत नसल्याने प्रवाशांच्या समस्या मार्गी लागेना
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दर तीन महिन्यातून होणारी प्रवासी सल्लागार समितीची बैठक यंदा नवीन वर्षात सहा महिने उलटूनही झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वेकडून बैठकीचे नियोजन होत नसल्यामुळे प्रवाशांच्या समस्या मार्गी लावायच्या तरी केव्हा,असा प्रश्न प्रवासी सल्लागार समितीच्या सदस्यांमधून उपस्थित करण्यात येत आहे.
रेल्वेतील प्रवाशांच्या व चाकर मान्यांच्या प्रवासातील समस्या मार्गी लावण्यासाठी रेल्वे बोर्डाने प्रत्येक विभागात रेल्वे प्रवासी सल्लागार समित्या नियुक्त केल्या आहेत. त्यानुसार मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातही प्रवासी सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत एकूण ३६ सदस्य आहेत. दर तीन महिन्यांनी भुसावळ रेल्वे प्रशासनाकडून या समितीच्या सदस्यांसोबत बैठक घेण्यात येत असते. या बैठकीत प्रवाशांच्या विविध समस्या व सोयी सुविधांबाबत चर्चा होत असते. मात्र, चालू वर्षांत २०२१ मध्ये जून महिना उलटण्यात येत असतानाही, अद्याप एकही बैठक झालेली नाही. रेल्वे प्रशासनाकडून कोरोना संसर्गाचे कारण सांगून,ही बैठक टाळण्यात येत आहे. गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये बैठक झाल्यानंतर, चालू वर्षात रेल्वे प्रशासनाकडून आता पर्यंत एकदाही बैठकीचे नियोजन न करण्यात आल्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या समस्या या कागदावरच आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तातडीने प्रवाशी सल्लागार समितीची बैठक घेण्याची मागणी समितीच्या सदस्यांमधून केली जात आहे. दरम्यान,या बैठकीबाबत 'लोकमत' प्रतिनिधीने भुसावळ रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधला असता, त्यांच्यातर्फे येत्या २५ जून रोजी ही बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
भुसावळ रेल्वे प्रशासनाला प्रवाशी सल्लागार समितीची बैठक घेण्याबाबत अनेकदा सांगितले. त्यांच्याकडून कोरोनामुळे बैठक होत नसल्याचे सांगण्यात येत होते. आता मात्र २५ जूनला बैठक ठेवली आहे. या बैठकीत प्रवाशांचे विविध प्रश्न मी मांडणार आहे.
संदीप कासार,सदस्य, रेल्वे प्रवाशी सल्लागार समिती
इन्फो :
कोरोनामुळे अनेक गाड्या व पॅसेंजर अद्यापही बंदच आहेत. जर प्रवासी सल्लागार समितीची सहा महिन्यांत एखादी बैठक झाली असती तर, स्थगित केलेल्या गाड्या सुरू करण्याबाबत काहीतरी निर्णय झाला असता. मात्र, सहा महिन्यांपासून ही बैठक न झाल्यामुळे प्रवाशांच्या समस्या या कागदावर आहेत.
नितीन सोनवणे, अध्यक्ष, चाळीसगाव रेल्वे प्रवाशी संघटना
इन्फो :
सल्लागार समितीला प्रवाशांच्या समस्येचे गांभीर्य नाही
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून भुसावळ विभागातून मुंबई व नाशिककडे जाणाऱ्या सर्व पॅसेंजर बंद आहेत. यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. तसेच ज्या गाड्या सध्या कोरोना काळात सुरू आहेत, त्या गाड्यांनाही मासिक पास उपलब्ध नाही. त्यामुळे चाकरमानी प्रवाशांना अजूनही खाजगी प्रवासी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. तसेच चार महिन्यां पासून रेल्वे प्रशासनाने जळगावहुन मुंबईकडे जाणाऱ्या कुशीनगर एक्स्प्रेस व अमृतसर एक्स्प्रेसच्या वेळात बदल केल्यामुळे जळगावहुन मुंबईकडे जाणाऱ्या हजारो प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. कोरोना काळात रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या वेळापत्रकात कुठल्याही प्रवाशी संघटनांना विश्वासात न घेता बदल केले. असे असतांना प्रवाशांना भुसावळ विभागातील प्रवासी सल्लागार समितीच्या एकाही सदस्याने याबाबत आवाज उठविलेला दिसून येत नाही. त्यामुळे रेल्वे सल्लागार समितीला प्रवाशांच्या समस्येचे गांभीर्य नसल्याची खंत रेल्वे प्रवाशांमधून व्यक्त करण्यात येत आहे.