बोदवड : शहरातील मुक्ताई मंगल कार्यालयामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित बैठक घेण्यात आली. यात तालुक्यातील शासकीय कार्यालयांकडे अडकलेल्या कामांच्या तक्रारींचा अक्षरशः महापूर आला होता. त्यात सर्वाधिक तक्रारी या पाणीपुरवठा तसेच पंचायत समितीच्या होत्या.
पालकमंत्री आपल्या दारी या कार्यक्रमात ही बैठक शनिवारी झाली. ठिबक नळ्यांसाठी ८० टक्के अनुदानामध्ये बोदवड तालुक्याचा समावेश केला असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच बोदवड तालुक्यासाठी ४० रोहित्र मंजूर करण्यात आले असल्याचेही ते म्हणाले.
ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शेलवड, मानमोडी, कोल्हाडी या गावांच्या १५ व्या वित्त आयोगाचा निधी परस्पर काढण्यात आल्याची तक्रार देण्यात आली. त्यावर सदर ग्रामसेवकावर फौजदारी गुन्हा दाखल करून वसुली करण्यात यावी, असे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना दिले.
तसेच तालुक्यातील नगरपंचायतच्या समस्यांबाबत शहरातील ३२ विहिरी मंजूर आहे पण निधी मिळाला नसल्याचे तसेच शहरातील घरकुलाचे रखडलेले अनुदान शहरातील तलाव, तालुका क्रीडांगण, लिंगायत समाज स्मशानभूमी जागा, या समस्यांबाबतही पालकमंत्री पाटील यांनी सूचना दिल्या.
शिरसाळा मंदिरासाठी ४० लाख मंजूर
तालुक्यातील शिरसाळा मारोती मंदिरासाठी ४० लाख मंजूर करण्यात आले तसेच शिरसाळा गावासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. चिखली व कोल्हाडी गावाच्या पाणीपुरवठा योजनेसाठी नवीन वीज जोडणी व विहीरही मंजूर करण्यात आली.
सदर बैठकीला तहसीलदार, मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी,गटविकास अधिकारी, वनक्षेत्रपाल, तालुका आरोग्य अधिकारी तसेच शिवसेना तालुकाप्रमुख गजानन खोडके, दीपक माळी, अमोल व्यवहारे, शांताराम कोळी, गोपाळ पाटील,काँग्रेसचे वीरेंद्रसिंग पाटील, सागर पाटील, नईम खान, डॉ. सुधीर पाटील, परेश अग्रवाल, आनंदा पाटील, आदी उपस्थित होते,
अग्निशमन बंबाचा निधी गेला परत
बोदवड शहराच्या अग्निशमन बंबासाठी ६० लाखाचा निधी दिला असून तो प्रस्ताव वेळेत न गेल्याने निधी परत गेल्याचे सांगत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचा फोनवर समाचार घेतला.