लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे बुधवारी सकाळी दमदार पुनर्रागमन झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही गुरुवारी सकाळपासून पाऊस सुरू आहे. बरसणाºया आनंदसरींनी बळीराजासह सर्वच जण सुखावले असून पिकांनाही जीवदान मिळाले आहे. जिल्ह्यासह हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तसेच वाघूर नदीच्या उगमस्थान परिसरातही जोरदार पाऊस झाला. यामुळे हतनूर धरणाचे ३६ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून तापी, पूर्णा नदीला पूर आला आहे. दुसरीकडे वाघूर नदीलाही पूर आला आहे. जून महिन्याची सुरुवात दमदार पावसाने झाली खरी मात्र मध्यंतरी वारंवार पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीची चिंता बळीराजाला लागली. तसे पाहता जून महिन्यात पावसाचा कमीच अंदाज वर्तविला होता. मात्र आता सर्वांना दमदार पावसाची प्रतीक्षा असून बुधवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने सर्वांना दिलासा मिळाला.
अल्हाददायक वातावरण घेऊन आली सकाळगेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड उकाडा होऊन पाऊस येणार असे सर्वांनाच वाटत होते. इतकेच नव्हे तर अनेक वेळा ढगाळ वातावरण होऊन पावसाचा शिडकावही झाला. मात्र दमदार पाऊस न होता वारंवार पावसाने दडी मारली. बुधवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होऊन गार वारा सुटला. काही वेळातच पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला एक-दीड तास मध्यम स्वरुपाचा पाऊस होत असताना सकाळी साडे दहा वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली. बहुप्रतीक्षेनंतर तब्बल पाऊण तास जोरदार पाऊस झाला. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला तरी दुपारी १२ वाजेपर्यंत कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरूच होता. अल्हाददायक वातावरण घेऊन आलेल्या बुधवारच्या सकाळने सर्वच जण सुखावले. दुपारी पावसाने उघडीप दिली तरी ढगाळ वातावरण कायम होते.
हतनूर धरणाचे ३६ दरवाजे उघडलेहतनूर धरण क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे हतनूर धरणाचे ३६ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. धरणातून ३० हजार ५१६ क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सकाळपासून तीन वेळा धरणाचे दरवाजे टप्प्या-टप्प्याने उघडण्यात आले. यामध्ये सकाळी नऊ वाजता धरणाचे १२ दरवाजे, त्यानंतर सकाळी १० वाजता १४ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले. पावसाचा जोर वाढून धरणात पाण्याचाही वेगही वाढू लागल्याने दुपारी एक वाजता धरणाचे ३६ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले. यामुळे तापी व पूर्णा नदीला पूर आला आहे.
जिल्ह्यात ५१ मि.मी. पाऊसजिल्ह्यात बुधवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात ५१ मि.मी. पाऊस झाला असून यामध्ये सर्वाधिक १५.३३ मि.मी. पाऊस यावल तालुक्यात तर त्या खालोखाल चोपडा तालुक्यात १०.८५ मि.मी. पाऊस झाला. जळगाव, भुसावळ, पाचोरा, धरणगाव तालुक्यात मात्र शून्य टक्के पावसाची नोंद झाली.
वाघूर नदीला पूरजळगाव व जामनेर तालुकावासीयांची तहान भागविण्याºया वाघूर धरणातही पाण्याचा वेग वाढला आहे. वाघूर नदीचा उगम असलेल्या अजिंठा लेणी जवळील डोंगररांगामध्ये जोरदार पाऊस झाल्याने वाघूर नदीला पूर आला आहे. अजिंठा लेणीमध्ये वाघूर नदीवरील सातकुंड धबधलाही कोसळू लागला आहे.