जळगाव : जिल्ह्याच्या विविध भागात शनिवारी मध्यरात्रीनंतर ते अगदी रविवारी पहाटेपर्यंत जोरदार पाऊस बरसला. या पावसामुळे काही ठिकाणी वीज खांब उन्मळून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता.
पहूर, ता. जामनेर येथे शनिवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. पाण्याला प्रवाह न मिळाल्याने काही दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले.
पाचोरा आणि पारोळा तालुक्यातही पाऊस झाला. पारोळा येथे वीज वितरण कंपनीचे खांब कोसळून जमीनदोस्त झाले, तर काही ठिकाणी वीजवाहिन्या तुटून पडल्या आहेत. त्यामुळे काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. अनेक मोठमोठे वृक्ष उन्मळून पडली आहेत. अनेकांच्या घर, झोपडी व पोल्ट्रीफार्मचे पत्रे उडून गेले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीत मका, ज्वारी, बाजरी पावसाच्या पाण्यात भिजल्याने व्यापारीवर्गाचे मोठे नुकसान झाले.
उर्वरित ठिकाणी हलका पाऊस झाला. भडगाव, अमळनेर, चाळीसगाव, एरंडोल आदी भागात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
वादळामुळे दोन महिला जखमी
रावेर व बोदवड तालुक्यातील घटना
भुसावळ विभागात शनिवारी मध्यरात्रीनंतर २४ तासांत पावसाने सर्वत्र हजेरी लावली. रावेर व बोदवड तालुक्यात केळी पिकाचे नुकसान झाले असून, या दोन्ही तालुक्यांत एकेक महिला जखमी झाली.
रावेर तालुक्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील पाहणी करीत असतानाच दुसरीकडे शनिवारी सायंकाळनंतर पावसाने हजेरी लावली. यातही केळी बागांचे मोठे नुकसान झाले आहे. पाल येथे वादळात झाडाची फांदी तुटून सुगंताबाई देवसिंग पारधी (वय ६५, रा. पाल) ही महिला जखमी झाली आहे. याच पावसाने सातपुड्यात १९० हेक्टर केळीबागा जमीनदोस्त होऊन ८१ घरे घरांचे नुकसान झाल्याचा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे.
बोदवड तालुक्यातही वादळी पाऊस झाला. यात अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील आमदगाव येथे शेतकऱ्याची म्हैस ठार झाली, तर घरावरील पत्रे उडून त्यावरील दगड लागून मनीषा कोळी ही महिला जखमी झाली.