जळगाव - ऑगस्ट महिन्यात पाठ फिरवलेल्या पावसाने सप्टेंबर महिन्यात जोरदार पुनरागमन केले असून, जळगाव जिल्ह्यात केवळ चार दिवसातच १०९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. खान्देशात एकूण सरासरीच्या तुलनेत जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक ७२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे आगामी काही दिवस पावसाचा जोर कायम राहिला, तर जळगाव जिल्ह्यात सरासरी इतका पाऊस होण्याचीही शक्यता आहे.
खान्देशातील धुळे, जळगाव व नंदुरबार या तीन्ही जिल्ह्यांमध्ये पावसाचे आगमन झाले आहे. मात्र, आगामी काही दिवस खान्देशात ढगाळ वातावरण कायम राहू शकते. मात्र, पावसाचा वेग कमीच राहण्याची शक्यता आहे. १७ सप्टेंबरनंतर काही प्रमाणात पुन्हा पावसाचे आगमन होऊ शकते. गेल्या चार ते पाच दिवसात झालेल्या पावसामुळे तीन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
खान्देशातील तीन जिल्ह्यांमध्ये झालेला पाऊसजिल्हा - झालेला पाऊस - एकूण सरासरीजळगाव - ४५९ मिमी - ७२.७ टक्केधुळे - ३३३ मिमी - ६२.३ टक्केनंदुरबार - ५२१ मिमी - ६०.६ टक्के
जून, ऑगस्ट या दोन महिन्यात झालेला पाऊस, केवळ चार दिवसात जळगाव जिल्ह्यात जून महिन्यात ४५ मिमी तर ऑगस्ट महिन्यात ४८ मिमी पाऊस झाला होता. या दोन्ही महिन्यात मिळून ९३ मिमी पाऊस झाला होता. त्या तुलनेत सप्टेंबर ६ ते ९ सप्टेंबर दरम्यानच्या चार दिवसातच जळगाव जिल्ह्यात १०९ मिमी पाऊस झाला आहे. म्हणजेच जून व ऑगस्ट या दोन महिन्यांचा पाऊस केवळ चार दिवसातच झाला आहे. दरम्यान, गेल्या चार वर्षांपासून जळगाव जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस झाला होता. यंदा देखील हेच चित्र पहायला मिळत असून, सप्टेंबर महिन्यातील एकूण पावसाची १२३ मिमी इतकी सरासरी आहे. ९ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात १०९ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे अजून काही दिवस या सरासरीत वाढ होऊ शकते.