यंदा मान्सून वेळेवर असे जरी हवामान खाते सांगत असले तरी अर्धा जून संपत आला तरी पेरणी योग्य पाऊस नाही. गेल्या वर्षाप्रमाणेच यंदादेखील कापसाची लागवड जास्त असून मका, ज्वारी व कडधान्ये यांचे क्षेत्र कमी अधिक प्रमाणात आहे. गेल्या वर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. महागडे बियाणे, मजुरांची वाढलेली मजुरी, खतांची दरवाढ यामुळे शेतीचे अर्थचक्र बदलले आहे. निसर्गाने साथ दिली तर ठीक, अन्यथा लागवडीचाही खर्च निघणे कठीण झाले आहे. शासनाने हमीभाव जाहीर करूनही ज्वारी व मक्याची खरेदी होत नाही. शासनाने कर्जमाफी जाहीर केली असली, तरी अजूनही सुमारे २० टक्के शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही. पीक कर्जाचीही तीच स्थिती आहे. राष्ट्रीयीकृत बँक पीक कर्जासाठी फिरवा फिराव करतात. कागदपत्रे देऊनही कर्ज मिळत नाही, अशी तक्रार शेतकरी करीत आहेत. निसर्गाची साथ नाही व दुसरे परिस्थितीचे संकट अशी तालुक्यातील शेतकऱ्यांची स्थिती आहे. दुबार पेरणीसाठी अनेकांकडे पैसे नाही. यापूर्वी नुकसान झाले, त्याचीही भरपाई शासनाने दिली नाही. केवळ पंचनाम्यांचे सोपस्कार केले गेले. यामुळे चिंतेत अधिकच वाढ झाली आहे. शासनाने मोफत बियाणे योजना आणली; पण तीही फारशी उपयोगाची नाही, अशीच परिस्थिती तालुक्यात सध्या दिसत आहे. तालुक्यात वाघूरसारखा प्रकल्प आहे; पण त्याचा सर्वाधिक फायदा हा अन्य तालुक्यांना असल्याचे लक्षात येते. प्रशासनाने यासाठी पाणी नियोजन योग्य पद्धतीने करणे गरजेचे होते; पण याबाबत येथे काहीसे दुर्लक्षच झाले असे म्हणावे लागेल. यामुळे शेतकरी संकटात आले आहेत.
पाऊस रुसल्याने बळीराजाची चिंता वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 4:11 AM