भुसावळ : जिल्ह्यासह राज्यांमध्ये हाहाकार माजवल्यानंतर आता मागील काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. त्यातच कमाल व किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.
दरवर्षीपेक्षा यंदा पावसाची सुरुवात चांगली झाली. त्यामुळे मे व जून महिना हा फारसा तापदायक गेला नाही. लवकर पाऊस आल्याने उन्हाळासुद्धा लवकर संपला, अशी परिस्थिती होती. मात्र मागील काही दिवसांपासून फक्त भुसावळच नव्हे, तर राज्यातील इतर जिल्ह्यांतही पाऊस नसल्यामुळे पुन्हा उन्हाळा सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हवामानाच्या अंदाजानुसार ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात पावसाची शक्यता खूप कमी आहे.
सकाळी दहापासून बसताहेत चटके
सकाळचे वातावरण हे चांगले असताना सकाळी १० वाजल्यापासूनच उन्हाचे चटके बसायला सुरुवात होत आहे. दुपारी साडेचारपर्यंत उन्हाचा त्रास सुरूच असतो. सायंकाळी पाचनंतर तापमानात घट व्हायला सुरुवात होत आहे. घरात उकाडा जाणवत असल्यामुळे पुन्हा एकदा कूलर आणि एसीचा वापर वाढला आहे.
मागील पाच दिवसांतील तापमान...
दिनांक आणि तापमान
५ ऑगस्ट ३२.५
६ ऑगस्ट ३३.३
७ ऑगस्ट ३४.५
८ ऑगस्ट ३३.७
९ ऑगस्ट ३४
गुरुवारपर्यंत खास पाऊस नाही. मात्र ११ व १२ दरम्यान विविध ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता असल्यामुळे हवामान कोरडेच राहण्याची शक्यता आहे. कोरड्या हवामानामुळे उष्णता वाढली आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ नीलेश गोरे यांनी ‘लोकमत’ला दिली.