भुसावळ : महामार्गावर रेल्वे उड्डाण पुलापुढे अयोध्यानगरसह सुमारे १५ हजार लोकसंख्येच्या परिसरातील नागरिकांना फेरा वाचावा याकरिता अंडरपास देण्यात आले आहेत. मात्र, यामध्ये तब्बल तीन फूट पाणी साचले असून नागरिकांना नवोदय पुलाखालून तब्बल दोन किलोमीटर फेरा मारून भुसावळकडे जावे लागत आहे.
महामार्गावरील रेल्वे उड्डाण पुलास लागून अयोध्यानगर, गणेश कॉलनी, भोईवाडा, नारायणनगर यासह नवीन वाढीव परिसरात दिवसागणिक वस्ती वाढत आहे. या परिसरातील नागरिकांना नाहाटा कॉलेज, बाजार परिसरात जाण्यासाठी दोन किलोमीटरचा फेरा वाचावा याकरिता आंदोलन केल्यानंतर अंडरपास देण्यात आला होता. मात्र, देण्यात आलेल्या अंडरपासमध्ये पहिल्याच पावसात तब्बल तीन फुटांपर्यंत पाणी साचत आहे. येथून ये-जा करणे जिकिरीचे झाले आहे.
पाण्यामुळे इंजिन पडतात बंद
अंडरपासमधून भुसावळकडे जाण्यासाठी केव्हा येण्यासाठी वाहन चालकांना तीन फूट पाण्यामधून मार्गक्रमण करावे लागते. तसेच दुचाकी, तीनचाकी वाहनांच्या इंजिनमध्ये पाणी जात असल्यामुळे ते पुलाच्या खाली बंद पडतात.