चाळीसगाव : दडी मारून बसलेल्या पावसाने २८ जून रोजी कमबॕॅक केल्यानंतर खोळंबलेल्या खरिपाच्या पेरण्यांना चालना मिळाली होती. मात्र २९ जूनपासून पाऊस पुन्हा गायब झाल्याने शेतकरी चांगलेच हवालदिल झाले असून, दमदार पावसाची प्रतीक्षाही कायम आहे. चार दिवसांपासून पावसाची हजेरी निरंक असल्याने जवळपास १८ ते २० हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या थांबल्या आहेत.
गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी पावसाने सुरुवातीपासूनच ओढ घेतली आहे. मान्सूनपूर्व पावसाने धूमशान घालत शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. तथापि, मृग नक्षत्रावर पाऊस साधा आभाळातही फिरकला नाही. या नक्षत्राचे तेरा दिवस कोरडेठाक गेल्याने खरिपाच्या पेरण्यांना पुन्हा ब्रेक लागला. एरवी मृग नक्षत्रावर होणाऱ्या पेरण्या या वर्षी आर्द्रा नक्षत्रापर्यंत लांबल्या.
चौकट
आर्द्राचीही ‘कोल्हेकुई’च
मृग नक्षत्राचे १३ दिवस निरंक हजेरी लावलेल्या पावसाने २१ जूनपासून झालेल्या आर्द्रा नक्षत्रावरही बळीराजाची घोर निराशा केली. या नक्षत्रातील सात दिवस उसंत घेत त्याने २८ रोजी चांगली हजेरी लावली. आर्द्रा नक्षत्राचे वाहन ‘कोल्हा’ असल्याने पुढे चार दिवस पाऊस गायब झाल्याने ही लबाड कोल्ह्याची ‘कोल्हेकुई’ ठरल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
१... आर्द्रा नक्षत्राच्या १४ दिवसांपैकी १० दिवस पूर्ण झाले आहेत. या १० दिवसांत २८ जून रोजी झालेला पाऊस वगळता इतर दिवशी त्याची हजेरी निरंक राहिली आहे.
२... येत्या सोमवारपासून पुनर्वसू नक्षत्राला सुरुवात आहे. आता याच नक्षत्रावर शेतकऱ्यांची सर्व मदार आहे.
चौकट
पाऊस गायब, करावी लागणार ‘डागडुजी’
पेरणीनंतर पाऊस आवश्यक असतो. कडधान्यासाठी त्याची उसंत फारशी त्रासदायक ठरत नाही. त्यामुळे २८ जूननंतर पेरणी झालेल्या कडधान्याच्या पिकाला पाऊस नसल्याने फारसा फरक पडणार नाही.
मात्र, कपाशी, मका लागवडीसाठी पेरणीनंतर पावसाची निकड अधिक असते. २८ जूननंतर जवळपास ६५ हजार हेक्टरवर पेरण्या आटोपल्या आहेत. यात बहुतांशी पेरणी कपाशी व मका पिकाची झाली असून, पाऊस नसल्याने ‘उतारा’ कमी होण्याची शक्यता शेतकऱ्यांंमधून वर्तविली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात ‘डागडुजी’ म्हणजे पुन्हा निम्म्या क्षेत्रावर पेरणी करावी लागणार, असाही सूर ग्रामीण भागातून वर्तविला जात आहे.
- ९१ हजार हेक्टरवर खरिपाच्या लागवडीचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवले आहे. शनिवारी अखेर ६५ हजार हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पाऊस पुन्हा दडी मारून बसल्याने उर्वरित १८ ते २० हजार हेक्टरवरील पेरण्यांना ब्रेक लागला आहे.
महत्त्वाची चौकट
उन्हाचा चटका वाढला, मात्र आर्द्रताही चांगली
सद्य:स्थितीत पावसाने ओढ घेतली आहे. पुढचे सात ते आठ दिवस तो गायबच राहणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांची काळजी वाढली आहे.
उन्हाचा चटकाही वाढला आहे. मात्र जमिनीत ओल व हवामानात आर्द्रताही चांगली असल्याने पिकांची स्थिती ठीक आहे. अजूनही पुढचे सात ते आठ दिवस पावसाविना पिके तग धरू शकतात अर्थात पावसाची ओढ कायम राहिल्यास आठ दिवसांनी खरिपाच्या पूर्ण पेरणीवरच दुबारचे सावट गडद होऊ शकते.
शनिवार अखेर प्रमुख पिकांचे पेरणी झालेले एकूण क्षेत्र (हेक्टरमध्ये)
कपाशी - ४७,६९०
मका - ८,०३६
ज्वारी - ७४०
बाजरी - ७४०
मूग - ६७२
उडीद - ५४८
इतर कडधान्ये - ५७५