जळगाव- तालुक्यात बुधवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे नंदगाव, शिरसोली, दापोरा, जळके, वावडदा या भागातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी घरांचे व गोठ्यातील पत्रे उडाले.नंदगाव परिसरात बुधवारी रात्री आठ वाजेपासून वादळासह पावसाने झोडपले. विजांच्या कडकडाटांसह सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. वादळामुळे गावातील अनेक घरे व गोठ्याची पत्रे उडाली.तुफान वादळी तडाख्यामुळे परिसरातील केळीबागांना मोठा फटका बसला. अनेक शेतांमध्ये केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या. केळीसह इतर पिकांचेही नुकसान झाले आहे. आधीच मे हिटमुळे अनेक केळीबागा नष्ट झालेल्या असतानाच आता वादळाचा फटका केळीला बसल्यामुळे परिसरातील बळीराजा हवालदिल झाला आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे व्हावेत, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.शिरसोली परिसरात नुकसानशिरसोली, दापोरा, जळके या भागातील केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. वेगात वारा आणि पाऊस असल्याने जळगाव रस्त्यावर अनेक झाडे कोसळली. बुधवारी शिरसोलीचा बाजार असल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली.वादळानंतर वीज गायबवादळी पावसाला सुरुवात झाल्यानंतर बुधवारी संध्याकाळी विजपुरवठा खंडीत झाला. नंदगाव येथील वीज पुरवठा तब्बल चौदा तास खंडीत होता. बुधवारी रात्री आठ वाजेपासून गुरुवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत हा विजपुरवठा खंडीत होता. यामुळे नागरिकांना अंधारातच रात्र काढावी लागली. याआधी मंगळवारीही पावसामुळे या परिसरात तब्बल सोळा तास 'बत्तीगुल' झाली होती.
जळगाव तालुक्यात वादळी पावसाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 1:41 PM
जळगाव तालुक्यात बुधवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे नंदगाव, शिरसोली, दापोरा, जळके, वावडदा या भागातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी घरांचे व गोठ्यातील पत्रे उडाले.
ठळक मुद्देवादळामुळे नंदगाव, दापोरा, शिरसोली येथील केळी बागा नष्टबुधवारी रात्री आठ वाजेपासून वादळी पावसाला सुरुवातग्रामीण भागातील घरे व गोठ्यावरील पत्रे उडाली तसेच झाडे कोसळले