लोकमत न्यूज नेटवर्क
महिंदळे, ता. भडगाव : परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी कपाशी लागवड केली होती. मात्र कापूस वेचणीवर आला असतानाच पावसाने मुसळधार बरसायला सुरुवात केल्याने या शेतीची पुरती वाताहत झाली आहे.
सुरुवातीला तुरळक पाऊस व आता अतिपाऊस असल्यामुळे वेचणीला आलेला कापूस बोंडातच अडकला आहे. झाडांवर पाला नसल्यामुळे शेतांनी जणू पांढरा शालू परिधान केला असल्याचे दिसते.
शेतकऱ्यांचे मुख्य पीक म्हणजे कपाशी, परंतु या पांढऱ्या सोन्याला अनेक रोगांनी ग्रासले व कपाशी पीक पूर्ण लाल पडले. झाडावरील सर्व पाला गळून पडला व आहे तो कापूस आता वेचणीवर आला असताना पाऊस मात्र तोही वेचू देत नाही. त्यामुळे सर्व कापूस शेतात भातासारखा दिसत आहेत.
खर्चाच्या तुलनेत उत्पन्न शून्य
शेती मशागतीपासून ते कापूस वेचणी पर्यंत शेतकऱ्यांना एकरी होणारा खर्च पाहता यावर्षी उत्पन्न शून्यावर येऊन ठेपले आहे.
एकरी खर्च
नांगरटी.... १५०० रुपये
रोटाव्हेटर.. १००० रुपये
बियाणे (दोन बॅग) १५०० रुपये
वखरटी... ५००० रुपये
रासायनिक खत १०,००० रुपये
फवारणी.... ५००० रुपये
कापूस वेचणी..७०० रुपये क्विंटल
एकूण खर्च २४७०० रुपये
कापूस येईल एकरी तीन क्विंटल पंधरा हजार रुपये
कापसाची सड आणि पड
पेरणीनंतर पावसाने सातत्याने ओढ दिल्याने विहिरींच्या तोकड्या पाण्यावर शेतकऱ्यांनी पिके जिवंत ठेवली. तुरळक पावसामुळे पिके जोमदार होती. उन्हाळी कपाशी लागवड केल्यामुळे झाडांवर माल लवकर तयार झाला. परंतु सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात अतिपावसामुळे व वातावरणातील आर्द्रता यामुळे कापूस पिकावर मर व लाल्या रोगाचे आक्रमण झाल्याने झाडांवरील पाला गळून पडला. त्यामुळे झाडावर फक्त बोंडेच शिल्लक राहिल्याने सततच्या पावसामुळे काही बोंडे काळी पडून सडली व काही फुटली, पण पावसामुळे तीही वेचणी करण्यासाठी पावसाचा व्यत्यय येत असल्यामुळे कापूस खाली पडण्यास सुरुवात झाली आहे. सततच्या पावसामुळे कवडी कापूस निघत आहे.
कापसाला कवडीमोल भाव
अतिपावसामुळे व वातावरणातील आर्द्रतेमुळे कापूस फुटण्यास अडचण येत आहे. थंड वातावरणामुळे व अतिपावसामुळे सड झाल्याने कवडी कापूस निघत आहे. त्यामुळे व्यापारी या कापसाला कवडीमोल भावाने घेत आहेत. पावसात वेचणी केलेला कापूस खराब होण्याच्या भीतीने शेतकरी मिळेल, त्या भावाने कापूस विकताना दिसत आहेत. व्यापारीही चार हजारपासून ते पाच हजार रुपये क्विंटल घेत आहेत. एकरी दहा क्विंटल येणारा कापूस यावर्षी दोन ते तीन क्विंटलवर थांबणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खर्चाच्या तुलनेत उत्पन्न शून्य येणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.
शेतकरी लागला रब्बीच्या नियोजनात
कपाशी पिकावर वेळेआधी मर व लाल्या रोगाचे आक्रमण झाल्याने दोनच वेचणीत कपाशी उपटून फेकावी लागणार असल्यामुळे शेतकरी पुढील पिकाच्या पिकाच्या नियोजन करताना दिसत आहे. कापसाचे पीक हाताचे गेल्याने व विहिरींना बऱ्यापैकी पाणी असल्यामुळे आता रब्बीच्या आशेवर शेतकरी आहे.
260921\26jal_9_26092021_12.jpg
महिंदळे परिसरातील कापसाचा शेतात झालेला भात.