जळगाव : शहरासह परिसरात दि. १३ रोजी मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पावसाचे पाणी हे अचानकपणे डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्याल व रूग्णालयाच्या प्रथमोपचार विभागात शिरले. यावेळी तिथे असलेल्या रूग्णांना रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने सुरक्षितस्थळी हलविले. दरम्यान कोरोना वॉर्डात कुठलेही पाणी शिरले नसून कोरोना रूग्ण हे सुरक्षितच असल्याची माहिती रूग्णालय प्रशासनाने दिली. दरम्यान, पावसामुळे आत पाणी शिरल्याने रुग्णालयाचे ६० ते ७० लाखांचे नुकसान झाले आहे.
शहरासह जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्री १२.३० वाजेपासून मुसळधार पाऊस झाला. या पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी नुकसानही झाले. गोदावरी रूग्णालय हे कोरोनासाठी अधिग्रहीत करण्यात आले आहे. या मुसळधार पावसामुळे पाणी रूग्णालयाच्या प्रथमोपचार विभागात शिरले. पाच ते सहा रूग्णांची स्क्रिनिंग केली जात होती. पाणी आत शिरल्याने कर्मचाऱ्यांनी या रूग्णांना सुरक्षितस्थळी हलविले.