जळगाव : कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर मार्चपासून बंद असलेली मुंबई ते दिल्लीसाठी राजधानी एक्स्प्रेस ३० डिसेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. आठवड्यातून चार दिवस ही गाडी धावणार असून, रेल्वेतर्फे बुकिंगलाही सुरुवात करण्यात आली आहे.
रेल्वे प्रशासनाने गेल्या वर्षापासून दिल्लीला जाण्यासाठी खास मुंबई-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस सुरू केली आहे. कोरोनामुळे मात्र ही गाडी बंद होती. ३० डिसेंबरपासून ही गाडी पुन्हा धावणार असून, (गाडी क्रमांक ०१२२१) डाउन ही गाडी दर सोमवारी, बुधवारी, शुक्रवारी व शनिवारी धावणार आहे. मुंबईहून दुपारी ४.१० वाजता निघून जळगावला रात्री सव्वानऊ वाजता पोहाेचणार आहे. तर, दिल्लीला सकाळी ११ वाजता पोहोचणार आहे.
गाडी क्रमांक (०१२२२) अप ही गाडी दर मंगळवारी, गुरुवारी, शनिवारी व रविवारी धावणार असून, दिल्ली येथून सायंकाळी ४.५५ वाजता सुटून, जळगावला सकाळी ६ वाजता पोहोचणार आहे.
इन्फो :
जळगावला थांबणाऱ्या तीन गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
रेल्वे प्रशासनातर्फे १ जानेवारी २०२१ पासून जळगाव स्थानकावर थांबा असलेल्या तीन गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. यामध्ये (गाडी क्रमांक ०२७१५) ही डाउन मार्गावरील नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस ही गाडी जळगावला पूर्वीप्रमाणे सायंकाळी पावणेसहा वाजता न येता, नव्या वेळापत्रकानुसार सायंकाळी ६ वाजता येणार आहे. तर (गाडी क्रमांक ०२७१६) ही अप मार्गावरील गाडी जळगावला सकाळी पावणेसात वाजता न येता, नव्या वेळापत्रकानुसार पहाटे ५ वाजता येणार आहे. तसेच पुणे-जम्मूतावी झेलम एक्स्प्रेस (गाडी क्रमांक ०१०७७) ही डाउन मार्गावरील गाडी जळगावला रात्री साडेबारा वाजता न येता, नव्या वेळापत्रकानुसार रात्री दीड वाजता येणार आहे. तर (गाडी क्रमांक ०१०७८) ही अप मार्गावरची ही गाडी जळगावला सकाळी ६ वाजता न येता, नव्या वेळापत्रकानुसार सकाळी सव्वासात वाजता येणार आहे. तर, गोरखपूर-कुशीनगर एक्स्प्रेस (गाडी क्रमांक ०१०१५) ही डाउन मार्गावरची गाडी जळगावला रात्री पावणेआठ वाजता न येता, नव्या वेळापत्रकानुसार सायंकाळी सव्वासात वाजता येणार आहे. तर, (गाडी क्रमांक ०१०१६) ही अप मार्गावरील गाडी जळगावला पहाटे सव्वाचार वाजता न येता, नव्या वेळापत्रकानुसार पहाटे साडेपाच वाजता येणार आहे. दरम्यान, सध्या ही गाडी नव्या वेळापत्रकानुसारच धावत असल्याचे रेल्वेतर्फे सांगण्यात आले.