जळगाव : सावदा नगरपरिषदेच्या नगरसेवक राजेंद्र श्रीकांत चौधरी यांनी व त्यांच्या पत्नी नगराध्यक्षा असताना पदाचा दुरुपयोग करीत स्वत:च्या घरासाठी वाढीव घरपट्टी लागू न करता जुन्या कायद्याप्रमाणेच घरपट्टी लागू ठेवल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. या संदर्भातील आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सोमवारी दिले.
२०११ ते २०१६ या काळात राजेंद्र चौधरी हे नगरसेवक व त्यांच्या पत्नी नगराध्यक्षा असताना त्या काळात नगरपरिषदेने सावदा येथे ४० टक्के वाढीव घरपट्टी लागू केली. मात्र चौधरी यांनी पदाचा दुरुपयोग करीत स्वत:साठी जुन्या कायद्याप्रमाणेच घरपट्टी कायम ठेवली व २०२०पर्यंत त्याप्रमाणेच त्यांनी घरपट्टी भरली या विषयी सावदा येथील शेतकरी अजय भागवत भारंबे यांनी त्यांच्याविरुद्ध अपात्रतेचा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केला होता.
या अर्जावर सोमवारी आदेश देण्यात आला व तक्रारदारांचा अर्ज मंजूर करून यातील सावदा येथील नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचे सिद्ध झाल्याने त्यांना नगरसेवक या पदावरून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अपात्र घोषित केले.