लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : गेल्या दोन वर्षापासून कोरोनाविरुद्धच्या लढाईत अग्रभागी असणाऱ्या आरोग्य विभागातील सेवकांसह डॉक्टर्स बांधवांना रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वणीवर शिवनेरी फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा मंगेश चव्हाण यांनी ‘राखी’ची अनोखी भेट देऊन त्यांचा आनंद व्दिगूणीत केला आहे.
या भेटीमुळे कोरोनायोद्धे भारावून गेले आहेत. एकूण दोन हजाराहून अधिक भाऊरायांना घरपोच बहिणीच्या वत्सल प्रेमाचा धागा म्हणून प्रतिभा चव्हाण यांनी या राख्या पाठविल्या आहेत. राखीसोबत पाठविलेल्या पत्रात त्यांनी कोरोनायोद्धांच्या कामाचे कौतुक करतांनाच त्यांना धीरही दिला आहे.
ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, सर्व शासकीय अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते यांनाही राखीची भेट पाठवली.
सुट्टीच्या दिवशी पोस्टमन बांधवांनी वाटप केल्या राख्या
रक्षाबंधनाची पर्वणी सर्वत्र रविवारी साजरी झाली. मात्र सुट्टी असूनही चाळीसगावच्या मुख्य पोस्टातील पोस्टमन बांधवांनी बहिणीच्या प्रेमाचा ओलावा असणारे हे ‘राखीचे धागे’ त्यांच्या बंधूपर्यंत मोठ्या आनंदाने पोहचविले. ‘सेवा ही धर्म’ हे पोस्ट विभागाचे ब्रीद पोस्टमन बांधवांच्या समर्पित कृतीतून स्पष्टपणे दिसून आले. पाचोरा, भडगाव आदी परिसरात जाऊनही राख्यांचे वाटप पोस्टमन बांधवांनी केले. पोस्टाला रविवारची सुट्टी असूनही दारात परगावी राहणाऱ्या भगिनींनी पाठविलेल्या राखींची पाकिटे घेऊन आलेल्या पोस्टमन बांधवांना पाहून अनेकांना सुखद धक्का बसला. पोस्टमास्तर मनोज करंकाळ यांनी यशस्वी नियोजन केले.