जळगाव : बहीण-भावाच्या नात्यातील वीण घट्ट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या रक्षाबंधनानिमित्त लग्नानंतर बाहेरगावी सासरी राहणाऱ्या ४५ हजार भगिनींनी आपल्या लाडक्या भावाला राखी पाठविली आहे. जिल्हाभरातील विविध शहरी व ग्रामीण भागातल्या पोस्टातून या राख्यांचे वाटप होत असून, जळगाव जिल्ह्यातूनही पोस्टामार्फत २५ हजार राख्या बाहेरगावी रवाना झाल्या आहेत.
दरवर्षी रक्षाबंधनाला बाहेरगावी राहणाऱ्या भगिनींकडून पोस्टामार्फत राख्या पाठविण्यात येत असतात. त्यानुसार यंदाही पोस्टाच्या जिल्ह्यातील जळगाव व भुसावळ येथील ७७ विभागीय कार्यालयांमधून शनिवारी सायंकाळपर्यंत पोस्टाच्या कर्मचाऱ्यांतर्फे राख्या वाटप करण्यात आल्या. गेल्या वर्षी कोरोनामुळे सार्वजनिक वाहतूक सुविधा बंद असल्यामुळे, भगिनींनी पोस्टाद्वारे आपल्या भावांना राखी पाठविण्याला पसंती दिली होती. मात्र, गेल्या वर्षापेक्षा यंदा बाहेरगावाहून पोस्टाने जिल्ह्यात आलेल्या राख्यांची संख्या जास्त आहे. गेल्या वर्षी पोस्टाने ३३ हजार राख्या आल्या होत्या. यंदा मात्र, बाहेरगावाहून ५० हजारांच्या आसपास राख्या आल्या आहेत. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही पोस्टामार्फत बाहेरगावी राखी पाठविण्यासाठी आकर्षक पाकिटांची निर्मिती करण्यात आली होती. गेल्या आठवड्यापासून पोस्टाच्या विविध कार्यालयांमधून राख्यांचे वाटप सुरू असून, आतापर्यंत जिल्ह्यातील विविध पोस्टाच्या कार्यालयांतून ५० हजार राख्यांची पाकिटे वाटप झाली आहेत, तर रक्षाबंधनानंतरही तीन ते चार दिवस बाहेरगावाहून राख्या येणार असल्याचे पोस्ट विभागातर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
सुटीच्या दिवशीही राख्यांचे वाटप होणार
पोस्टामार्फत दरवर्षी बाहेरगावाहून येणाऱ्या राख्यांची मोठ्या प्रमाणावर असते. भाऊ-बहिणींच्या नात्याचा हा पवित्र सण असल्यामुळे, रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक भावापर्यंत राख्यांची पाकिटे पोहोचविण्याचे पोस्टाचे उद्दिष्ट असते. त्यामुळे यंदा रक्षाबंधन असले तरी, टपाल वाटप करणाऱ्या पोस्टमन कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. पोस्टमन बांधवांमार्फत रक्षाबंधनाच्या दिवशीही बाहेरगावाहून आलेल्या राख्यांचे वाटप केले जाणार असल्याचे जळगाव विभागाचे डाक अधीक्षक डॉ. बी.एच. नागरगोजे यांनी सांगितले.