ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 3 - संसदेत मंजूर झालेल्या नॅशनल मेडिकल बिलाच्या समर्थनार्थ जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर संघटनेच्यावतीने 5 व 6 रोजी दिल्ली येथे रामलीला मैदानावर रॅली काढण्यात येणार असून यामध्ये जळगाव जिल्ह्यातील डॉक्टरही सहभागी होणार आहेत. या रॅलीत राज्यभरातील सुमारे 68 हजार तर जळगाव जिल्ह्यातून सुमारे 3 हजार 200 डॉक्टर सहभागी होणार असल्याची माहिती डॉ. रितेश पाटील यांनी दिली. या संदर्भात शुक्रवारी दुपारी पत्रपरिषद होऊन या विषयी माहिती देण्यात आली. या वेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. रितेश पाटील, डॉ. सुशील मंत्री, डॉ. अमिन पटेल, डॉ. संजय शहा, डॉ. देवानंद कुळकर्णी, डॉ. अविनाश महाजन, डॉ. प्रशांत मंत्री यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.डीएचएमएस, बीएचएमएस व एमबीबीएस या डॉक्टरांच्या माध्यमातून रुग्णांची सेवा व्हावी, यासाठी सरकारने नॅशनल मेडीकल बिल संसदेत मंजूर केले आहे. यामुळे होमिओपॅथी डॉक्टरांना ‘हेल्थ फॉर ऑल’च्या माध्यमातून संबंधित अभ्यासक्रमाचे त्यांना 6 महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या बिलाचे समर्थन करण्यासाठी होमिओपॅथी डॉक्टरांनी एक संस्था स्थापन केली असून या संस्थेतर्फे दिल्ली येथील रामलीला मैदानावर रॅली काढण्यात येणार आहे. त्यामुळे 5 व 6 रोजी जिल्ह्यातील होमिओपॅथी डॉक्टरांनी आपली वैद्यकीय सेवा बंद ठेवावी असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.