श्रीराम जन्मोत्सवासाठी आकर्षक रोशणाई : शताब्दी वर्षे केले साजरे
जळगाव,दि.4- शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या चिमुकले राम मंदिरास 100 वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम उत्साहात झाले. मंगळवारी रामनवमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम नवमीनिमित्त मंदिरावर आकर्षक रोशणाई करण्यात आली आहे.
जळगावतील धार्मिक, सांस्कृतीक चळवळीत मोठा इतिहास या मंदिराला लाभला आहे. मंदिराची स्थापना शके 1837 रोजी श्रीकृष्ण जयंती च्या मुहूर्तावर झाली व शके 1839 चैत्र शुध्द पौर्णिमा म्हणजेच हनुमान जयंतीला मंदिराचे काम पूर्ण झाले. इंग्रजी कालदर्शिकेनूसार सन 1915 ते 1917 असा दोन वर्षाचा काळ मंदिर उभारणीला लागला. आपल्या धार्मिक कार्याने मोलाचे स्थान यातून प्राप्त झाले आहे. चिमुकले राम मंदिर राम नवमीला 100 वे वर्ष साजरे करीत आहे. आपल्या धार्मिक सेवेने भक्तांना राम सेवेची वाट दाखवत गेली शंभर वर्षे राम भक्ती केली आहे.
म्हणून चिमुकले राम मंदिर नाव
मंदिराचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे श्रीरामाच्या डोळ्यात काजळ भरण्यात येते. शंभरवर्षापासूनची ही परंपरा आजही कायम आहे. या मंदिरातील श्रीरामाची मूर्ती ही अवघी सव्वा फुटाची आहे. त्यामुळे याला चिमुकले राम हे नाव पडले. परिसर मोठा पण मूर्ती छोटी या युक्तीवर मंदिराला चिमुकले राम मंदिर हे नाव देण्यात आले आहे.
शिलालेखातून धर्मनिरपेक्षतेचा संदेश
मंदिराची स्थापना झाल्यानंतर या ठिकाणी शिलालेख तयार करण्यात आला आहे. या शिलालेखावर ‘सरकारची सर्व धर्मासंबधी समबुध्दी आणि पूर्व खान्देशच्या लोकांची धर्मबुध्दी या दोन्हींचा मिलापाचे स्मारक’ असे लिहण्यात आले आहे. राम मंदिरात प्रवेश करतानाच हा भव्य शिलालेख दिसतो. यातून मंदिर स्थापनेचे ध्येय व उद्दीष्टये लक्षात येतात. मंदिराच्या स्थापनेपासून राम भक्तींची कास धरत मंदिराची वाटचाल सुरु आहे.