तीन-तीन दिवस करावी लागते घंटागाड्यांची प्रतीक्षा :
दररोज निघणारा कचरा - २७० टन
मनपाच्या घंटागाड्या - ८५
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील दैनंदिन सफाईचे काम वॉटरग्रेस कंपनीकडून सुरू आहे. मात्र, शहरातील स्वच्छतेचा प्रश्न वॉटरग्रेस कंपनीला अद्यापही सोडविता आलेला नाही. अजूनही शहरातील अनेक भागांत तीन-तीन दिवस घंटागाड्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. घंटागाड्यांचा कारभार रामभरोसे असून यामुळे व्यवस्थापनाचा पूर्णपणे कचरा झाल्याचे दिसून येत आहे.
मनपाकडून वॉटरग्रेसला मक्ता दिल्यापासून हा मक्ता अस्वच्छता, कचऱ्याचे वजन वाढविणे, घंटागाड्या नियमितपणे न येणे अशा समस्यांमुळे गाजला आहे. गेल्या आठ दिवसांपासून अनेक कर्मचाऱ्यांना वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे अनेक भागांत घंटागाड्या पोहोचू शकत नाहीत. चार दिवसांपासून घंटागाडी न आल्याने ठिकठिकाणी शहरात कचऱ्याचे ढीग पसरले आहेत.
जीपीएस प्रणाली कार्यान्वित
१. घंटागाड्यांवर लक्ष ठेवण्यासाठी मनपाने जीपीएस प्रणाली कार्यान्वित केलेली आहे. मात्र, या यंत्रणेचा फायदा होताना दिसून येत नाही. अनेक भागांत घंटागाड्याच पोहोचत नाहीत.
२. घंटागाडी चालकांनीच काम बंद आंदोलन पुकारल्याने घंटागाड्यांना चालकच नसल्याने बऱ्याच गाड्या पडून असतात. त्यामुळे जीपीएस प्रणालीचा लाभदेखील होत नाही.
जमा केलेल्या कचऱ्यावर कुठलीही प्रक्रिया होत नाही
शहरातून दररोज सरासरी २७० टन कचरा जमा होत असून, महिन्याला सुमारे ७ हजार टनपर्यंत कचरा आव्हाणे भागातील मनपाच्या बंद पडलेल्या घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी टाकला जातो. मात्र, सात वर्षांपासून हा प्रकल्प बंदच असल्याने कचऱ्यावर कुठलीही प्रक्रिया होतच नाही.
कचऱ्यावर बायोमायनिंग प्रक्रिया करण्यासाठी मनपाने ४ कोटी रुपयांचा मक्ता दिला आहे. मात्र, मक्तेदाराकडूनही तोकडेच काम केले जात आहे. यामुळे कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी गेल्या सात वर्षांपासून लाखो टन कचरा कुठल्याही प्रक्रियेविना पडून आहे.
कोट..
प्रत्येक भागात घंटागाड्या या वेळेवर जात आहेत. गेल्या आठवड्यात काही कर्मचाऱ्यांना वेतन न मिळाल्याने त्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले होते. यामुळे काही भागात घंटागाड्या पोहोचू शकल्या नाहीत. मात्र, त्यानंतर कर्मचाऱ्यांचे वेतन सुरू झाल्यामुळे पुन्हा घंटागाड्या नियमित सुरू झाल्या आहेत. तसेच जीपीएस प्रणालीद्वारे घंटागाड्यांची स्थितीदेखील तपासली जाते.
- पवन पाटील, आरोग्य अधिकारी, मनपा