सुनील पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत इंडिया आघाडीची बैठक होत आहे. या बैठकिसाठी आलेल्या नेत्यांनी मुंबईची हवी खावी, तेथील समुद्र बघावा. त्यांनी कितीही कांगावा केला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वात केंद्रात पुन्हा आमचे सरकार येणार असा विश्वास केंद्रीय राज्य मंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी गुरुवारी जळगावात व्यक्त केला.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मेळाव्यासाठी रामदास आठवले जळगाव दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी अजिंठा शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवर टिका केली. इंडिया आघाडीने पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवावा. आता २६ पक्ष एकत्र आले आहेत त्यात अजून १६ ते १७ पक्ष समावेश होणार असल्याची माहिती आहे. आगामी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष मोदींच्या नेतृत्वात महायुती सोबत राहील व आमचेच सरकार सत्तेत येईल.
राज्यात मंत्रीपद हवे
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरात लवकर करावा आणि आम्हाला एक मंत्रीपद आणि महामंडळ द्यावे अशी आमची मागणी आहे. वर्षा बंगल्यावर महायुतीची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीची बैठक होणार आहे. त्या बैठकीला आपल्यालाही बोलावणं आले आहे तेथे उपस्थित राहणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.
मुख्यमंत्री शिंदे व अजित पवार यांच्यात वाद नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यात कोणताही वाद नाही. ज्या मंत्र्यांना जी खाती दिली गेली आहेत. त्यांचे अधिकार त्या मंत्र्यांकडे असतात. तसेच मंत्री मंडळाचे निर्णय हे सामूहिक असतात. ही सामूहिक जबाबदारी असते. त्यामुळे सर्वच निर्णय देवेंद्र फडणवीस घेतात असे नाही. अजित पवार देखील शिंदे व फडणवीस यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेत आहेत. त्यामुळे यात वादाचा विषय नाही, असेही आठवले म्हणाले.