जळगाव - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेच्या दोन तृतीयांश सदस्य संख्येचे बहुमत आहे. त्यामुळे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह त्यांनाच मिळायला हवे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केली. पण याचा निर्णय निवडणूक आयोग घेईल, असेही त्यांनी सांगितले. ते अजिंठा विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
आठवले म्हणाले, की लोक मोठ्या प्रमाणांत शिंदेंसोबत जात आहेत. शिंदेंनी मॅच जिंकली असून, उद्धव ठाकरे यांचा पराभव झाला आहे. ठाकरेंना आपले आमदार, खासदार टिकवता आलेले नाहीत. फडणवीस व शिंदे यांचे सरकार गतिशील आहे. येत्या निवडणुकीत रिपाइं (आ.) पक्ष भाजपा व शिंदे यांच्या पाठिशी उभा राहणार आहे. रिपाइंला दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद, एक आमदारकी हवी आहे. याची चर्चा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झाली आहे. पक्षाचा प्रभाव असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व मनपांमध्ये जागांची मागणी केली आहे. या संदर्भात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा झाली आहे.
शिंदे सरकार कोसळू देणार नाही
आम्ही शिंदे सरकार कोसळू देणार नाही. सर्वांना मंत्री करता येत नाही पण मंत्री केले नाही म्हणून कुणीही आमदार शिंदे यांना सोडून परत जाणार नाही. अजित पवार यांना पहाटेच्या शपथविधीची सवय आहे. ते इकडे येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे, असेही आठवले एका प्रश्नावर बोलताना म्हणाले.
दोघांचेही मेळावे पाहणार
दसऱ्याला एकनाथ शिंदे यांचा मेळावा बघायला आवडेल. पण उद्धव ठाकरे काय बोलतात हे पाहण्यासाठी त्यांचाही मेळावा बघायला आवडेल. शिवतीर्थावरील उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यापेक्षा एकनाथ शिंदे यांचा मेळावा अधिक सरस ठरेल. शिवसेनेने गद्दार, पानटपरीवाला अशा वैयक्तिक टीका आता करू नयेत.
तो विषय भाजपाचा अंतर्गत मामला
आ. एकनाथ खडसे माझे चांगले मित्र आहेत. ते भाजपामध्ये परत येणार की नाही हे माहीत नाही. हा भाजपाचा अंतर्गत प्रश्न आहे, असेही आठवले म्हणाले.
खा. राहुल गांधींकडे ते बळ नाही
खा. राहुल गांधी यांनी पावसात भिजत सभा घेतली. त्यांनी खा. शरद पवार यांची कॉपी केली. पवारांनी पक्षाचा उमेदवार निवडून आणला पण राहुल गांधी काँग्रेसला बळ देऊ शकत नाहीत.
रिपाइंला करणार व्यापक
रिपाइंला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेनुसार व्यापक करणार असून, सर्व समाजाला पक्षात एकत्र आणणार आहेत. त्यासाठी विविध आघाड्या स्थापन केल्या आहेत. असे आठवले यांनी सांगितले.