जळगाव : शहरातील संकलित कचरा घंटागाड्यांमधून कॉम्पॅक्टरमध्ये ट्रान्समीशन करण्यासाठी शहरात चार ठिकाणी उभारण्यात आलेल्या रॅम्पचे काम निविदा न काढताच करण्यात आले आहे. तसेच घनकचरा व्यवस्थापनच्या डीपीआरच्या निकषांचे आकलन न करताच हे काम करण्यात आले असून, याकामाच्य प्रक्रियेबाबत संशय निर्माण होत आहे. त्यामुळे या प्रक्रियेत प्रकल्प अभियंता योगेश बोरोले यांची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केली आहे.प्रशांत नाईक यांनी याबाबत मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटला आहे की, कचरा वाहतुकीसाठी उभारण्यात आलेल्या रॅम्पच्या कामात क्लिष्ठता निर्माण झाली असून कामाचे पेमेंट अदा करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. १२ कोटींच्या डीपीआरमधून हे काम होणार होते. तसेच हे काम लक्ष्मी कस्ट्रक्शन कडून करणार होते. मात्र, हे काम स्थानिक मक्तेदाराकडून करण्यात आले आहे. तसेच यासाठी कोणतीही निविदा प्रक्रिया राबविण्यात आली नसल्याचेही म्हटले आहे. आरोग्य विभागांतर्गत चार ठिकाणी रॅम्प उभारले असून या कामासाठी १७ लाखाचा खर्च अपेक्षित आहे. या कामाच्या बिलं अदा करण्यासंदर्भात संभ्रम असून त्यासंदर्भात नाईक यांनी तक्रार केली आहे. या प्रकरणात प्रकल्प अभियंता योगेश बोरोले यांच्याकडून मनमानी कारभार सुरु असल्याचा आरोप नाईक यांनी केला आहे. तसेच प्रकल्प विभागातील बोरोले हे नगरपालिका असताना रोजंदारीवर कामावर होते. याआधारे न्यायालयाच्या आदेशाने बोरोले हे पालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणुन रूजू झाले. सध्या त्यांच्याकडील जबाबदारीत वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप नाईक यांनी केला आहे. याप्रकरणात बोरोले यांची चौकशी करून झालेला खर्च त्यांच्याकडून वसुल करण्याची मागणी केली आहे.
निविदा न राबविता केले रॅम्पचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 12:43 PM