लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात शनिवारी पार पडलेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांमध्ये राजस्थान विद्यापीठ, जयपूर आणि महिलांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर या संघांनी विजेतेपद मिळवले. तर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मुलांच्या संघाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेतील अव्वल चार संघ भुवनेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या अ.भा. बॅडमिंटन स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.पुरुषांच्या गटात जयपूर आणि कोल्हापूर विद्यापीठाने चार गुणांची कमाई केली. मात्र जिंकलेल्या गेमच्या आधारावर जयपूर विद्यापीठाला विजयी घोषित करण्यात आले, तर कोल्हापूरला तिसरे स्थान देण्यात आले. त्याचप्रमाणे उमवि आणि नागपूर विद्यापीठाचे दोन गुण आहेत.शनिवारी सकाळी महिलांच्या झालेल्या चुरशीच्या साखळी सामन्यात वीर नर्मद दक्षिण विद्यापीठ, सुरत विरुद्ध राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर यांच्यात झालेल्या लढतीत नागपूर संघाने सुरत विद्यापीठावर २-१ ने विजय प्राप्त केला. तर महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा विरुद्ध राजस्थान विद्यापीठ, जयपूर यांच्यात झालेल्या लढतीत बडोदा संघाने जयपूर संघाला २-१ ने नमविले. पुरुष संघांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर विरुद्ध उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्यात झालेल्या सामन्यात जळगाव संघाने नागपूर संघाला ३-१ ने नमविले. तर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विरुद्ध राजस्थान विद्यापीठ, जयपूर यांच्यात झालेल्या चुरशीच्या सामन्यात जयपूर संघाने ३-० असा एकतर्फी विजय मिळविला. साखळी सामने संपल्यानंतर एकूण गुणांच्या आधारावर चार क्रमांक जाहीर करण्यात आले. महिलांमधून वैष्णवी भाले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर, तर पुरुषांमधून पीयूष मीणा, राजस्थान विद्यापीठ, जयपूर हे एकूण स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू ठरले. महिला व पुरुष संघातील हे चारही संघ ५ ते ९ जानेवारीदरम्यान भुवनेश्वर येथे होणाºया अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. समारोप उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा.पी.पी. माहुलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या वेळी मंचावर व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील, कुलसचिव भ.भा. पाटील, क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.जी.ए. उस्मानी यांनी केले. सहायक क्रीडा संचालक आर.ए.पाटील यांनी आभार मानले.
उमविचा नागपूरवर ३-२ ने विजयउत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठावर ३-२ ने विजय मिळवला.उमविच्या प्रणव पाटील याने अपूर्व आग्रेवर २१-१२,२१-१० असा विजय मिळवला.नागपूरच्या गौरव रेगे याने एकेरीत उमविच्या दिलीप शिरसाठवर २१-१२, २१-१३ असा विजय मिळवला.दुहेरीत उमविच्या प्रणव पाटील आणि शुभम पाटील यांनी नागपूरच्या गौरव रेगे आणि प्रतीक बोंडे यांच्यावर २४-२६, २१-१८, २१-१६ असा विजय मिळवला.तिसºया एकेरी सामन्यात शुभम पाटील याने विनय माकोडेवर २३-२५, २१-१५,२२-२० असा विजय मिळवला.
स्पर्धेचा अंतिम निकालमहिला संघ- प्रथम- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर (६ गुण), द्वितीय- वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठ, सुरत (४ गुण), तृतीय- महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा (२ गुण), चतुर्थ- राजस्थान विद्यापीठ, जयपूर (० गुण) .पुरुष संघ- प्रथम- राजस्थान विद्यापीठ, जयपूर (४ गुण), द्वितीय- शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (४ गुण), तृतीय- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर (२गुण), चतुर्थ- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव (२ गुण).