जळगाव : परिवर्तनतर्फे आयोजित साहित्य अभिवाचन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी बंगाली साहित्यातील ‘पाथेर पांचाली’ या कादंबरीचे ऑनलाईन सादरीकरण करण्यात आले. या अभिवाचनाने रसिक मंत्रमुग्ध झाले.
बिबुतीभूषण बंदोपाध्याय लिखित या कादंबरीचे अभिवाचन परिवर्तनने आपल्या निर्मितीतून सहज उलगडून दाखवली. बंगालमधील लोकजीवन, संस्कृती रसिकांनी अनुभवली. आत्याबाईंच्या भूमिकेत नयना पाटकर यांनी आपल्या सहजसुंदर वाचनाने रंग भरले. तर अनिल पाटकर यांचे धीरगंभीर आवाजातील निवेदन, नारायण बाविस्कर यांनी उभ्या केलेल्या विविध भूमिका, मंजुषा भिडे, गायत्री कुलकर्णी यांनी अभिवाचनात आपल्या अंगभूत शैलीने, प्रभावीपणे सादरीकरण केले. मोना निंबाळकर, स्वरा जोशी यांनी उत्तम भूमिका साकार केल्या.
गाणे, स्वरांनी आली रंगत
कादंबरीच्या आशयाला अनुरूप पार्श्वसंगीताचा चपखल उपयोग करून पाथेर पांचालीतील दुर्गा, आत्या व सुनबाई यासारख्या व्यक्तीरेखा व अनेक प्रसंग रसिकांच्या मनाला स्पर्श करून गेले. मूळ बंगाली भाषिक असलेल्या सुदिप्ता सरकार यांच्या गाण्यांनी, स्वरांनी अभिवाचनाच्या सादरीकरणात रंगत आणली. गाजलेल्या साहित्याचा नव्या पिढीला परिचय व्हावा या हेतूने वाचन संस्कृती समृद्ध करू या हे ब्रीद घेऊन परिवर्तन अभिवाचन महोत्सवाचे आयोजन केले. कादंबरीच्या अभिवाचनाची संकल्पना व दिग्दर्शन शंभू पाटील यांनी केले. पार्श्वसंगीत राहुल निंबाळकर यांचे होते.
आज ‘गांधी नाकारायचा आहे पण कसा?’
अभिवाचन महोत्सवात सोमवार, १ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता शंभू पाटील लिखित ‘गांधी नाकारायचा आहे पण कसा?’ हे अभिवाचन परिवर्तनचे कलावंत सादर करतील.
फोटो : ०१ सीटीआर ४३