जळगाव : २०२० मध्ये कहर केलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक लसीकरणाचा वेग जिल्ह्यात सद्यस्थितीत अत्यंत कमी आहे. लसीकरणाला ३५ दिवस उलटले असून जिल्ह्यातील केवळ ०.२५ टक्के लोकसंख्या यात कव्हर झालेली आहे. जिल्ह्यात याच गतीने सर्वांना लस द्यायचे म्हटल्यास ३६ वर्षांचा कालावधी लागणार आहे. यात शासकीय यंत्रणा कमी पडत असल्याने आता खासगी यंत्रणांचा सहभाग वाढविणे क्रमप्राप्त असून तसा पर्याय विचाराधीन असू शकतो, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले.
जिल्ह्यातही १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातील २४ हजार ३०० डोस प्राप्त झाले होते. त्यामुळे केंद्र कमी ठेवण्यात आले होते. मात्र, नंतर १९ हजार डोस प्राप्त झाल्याने केंद्र वाढविण्यात आले. पहिला टप्पा काही अंशी आटोपण्याचे चित्र असताना लागलीच महसूल व पोलीस प्रशासनाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे.
अशी स्थिती असे भवितव्य
लसीकरणाला झाले : ३५ दिवस
एकूण लसीकरण : ११६६३
एकूण लोकसंख्या : २०११च्या जनगणनेनुसार ४२२४४४२ (२०२१ मध्ये अंदाजित वाढ होऊन ४५०००००)
लोकसंख्येच्या प्रमाणात लसीकरणाची टक्केवारी : ०.२५ टक्के
जिल्ह्यातील केंद्र : १८
उदिष्ट : ३६०० प्रतिदिवस
प्रत्यक्ष लसीकरण : सरासरी ८०० प्रतिदिवस
समजा २५ टक्के लोकांनी लस घेतली नाही तरीही ७५ टक्के लोकसंख्येला लस देण्यासाठी २६ वर्षे लागतील.
कोट
कोरोना लसीकरणासाठी येणाऱ्या लसीचे डोस यांची उपलब्धता यानुसार टप्प्याटप्प्याने केंद्राची संख्या वाढवून प्रत्येक उपकेंद्र, तसेच शक्य झाले तर गावागावात लसीकरण केले जाईल. दिवसाला किमान ५० हजार लोकसंख्येला लस दिली जाईल, असेही नियोजन होऊ शकते आणि शंभर दिवसात जिल्ह्यात लसीकरण पूर्ण होऊ शकते. यात खासगी यंत्रणांना सहभागी करून घेता येऊ शकते, मार्गदर्शक सूचनानुसार तसा निर्णयही घेण्यात येईल.
- डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक
सद्यस्थितीत जळगाव शहरात आधीच खासगी यंत्रणांची केंद्रे सुरू आहेत. तांत्रिक अडचणी दूर करून नियोजनबद्ध पद्धतीने लसीकरणाची मोहीम राबविणे आवश्यक आहे. यावर संपूर्णत: सरकारचे नियंत्रण आहे. त्यामुळे खासगी यंत्रणेची भूमिका नाही. एका दिवसात शंभर लोकांना एसएमएस पाठविण्याऐवजी दीडशे लोकांना पाठवावे, याने अधिक लोक येऊ शकतात.
- डॉ. स्नेहल फेगडे, सचिव, आयएमए
कुठे ५ तर कुठे ७ जणांचे लसीकरण
लसीकरणाचा वेग अत्यंत थंडावल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून काही केंद्रांवर आहे. यात पारोळा, पाचोरा, एरंडोल येथील केंद्रांवर तर दिवसभरात केवळ ५ किंवा ७ लोकांचे लसीकरण होत आहे. यंत्रणा मात्र, तेवढीच कामाला लागली आहे. त्यामुळे हा वेग वाढविणे, कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे, केंद्र वाढविणे आदी बाबींवर प्रशासनाला भर द्यावा लागणार आहे.