रावेर - वाघोदा येथील रहिवासी असलेल्या सत्तारखान बशीरखान या मौलांनानी सावदा शहरातील मशिदीत साफसफाईचे सेवाव्रत धारण केले आणि या सेवेच्या पुण्याईच्या फळातून त्यांच्या 14 वर्षीय गुलाम हुसेन या हुशार मुलानं पायाने लिहिण्याचं बळ मिळालंय व तल्लख बुद्धीमत्तेच्या जोरावर त्यानं अपंगत्वावर मात केली आहे. सावदा शहरातील अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या हुशार व 100 टक्के अपंग असलेल्या विद्यार्थ्याला संजय गांधी निराधार योजनेतून आर्थिक साहाय्य देत सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी रावेर तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागाचे प्रशासन सरसावले असल्याने त्यांचे एकच कौतुक होत आहे.
वाघोदा (बु)येथील बेघर व भूमीहीन असलेल्या मौलाना सत्तारखान बशीरखान हे आपल्या पत्नी व दोन मुले तथा दोन मुली अशा परिवाराचा रहाटगाडा नुसत्याच अल्लाहच्या दरबारात समर्पित केलेल्या साफसफाईचे सेवेवर हाकत आहेत. परिस्थिती कमालीची प्रतिकूल असली तरी या सेवेत मिळणाऱ्या अल्पशा अडीच - तीन हजार रुपयांच्या मानधनावर ते प्रचंड सुखासमाधानाने आपला चरितार्थ भागवत आहेत. चारही मुलाबाळांमधील थोरला मुलगा गुलाम हुसेन हा जन्मतःच दिव्यांग आहे, स्वतःच्या हातानं कोणतीही वस्तू पकडण्याचे वा उचलण्याचे कोणतेही सामर्थ्य त्याच्याकडे नसल्याची मोठी शोकांतिका आहे. मात्र,यावर त्यानं जिद्दीनं मात केली आहे.
आपल्याला मुलाला शक्ती मिळावी, या इच्छेपोटी भोळी आशा मनी बाळगून मौलाना सत्तारखान बशीरखान यांनी वाघोद्यापासून अवघ्या चार - पाच किलोमीटर अंतरावरील सावदा शहरातील मशिदीत साफसफाई करण्याचे सेवाव्रत अंगिकारले. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता निरपेक्ष भावनेने सेवाव्रती सत्तार मौलानांच्या सत्कर्मावर नमाजी समाजबांधवानी त्यांना मानधन देण्याचा निर्णय घेतला. "माझे पुण्य फळा आले |आज मी दत्तगुरू पाहिले ||" अशा भावगीताप्रमाणे म्हणा की काय सत्तार मौलानांच्या उदरनिर्वाहाचा काहीअंशी प्रश्न त्या मानधनाने तर सुटला.
मात्र, जन्मतःच दोन्ही हातांनी अधू व अपंग असलेला मुलगा गुलाम हुसेन यास चक्क उजव्या पायाच्या बोटांमध्ये पेन्सिल व पेन धरण्याचे बळ मिळाल्याने शिक्षणाचा कित्ता गिरवण्याची सरशी गाठली. वडिलांच्या कर्मधर्मयोगाने आपल्या अपंगत्वावर मात करण्याचे कसब पणाला लावण्याचे अंतिम ध्येय उराशी बाळगून गुलाम हुसेन ने शिक्षण घेण्याची बाळगलेली दुर्दम्य इच्छाशक्ती, जिद्द, चिकाटी पाहता तल्लख बुध्दीमत्तेच्या जोरावर त्याने सावदा शहरात वडीलांसोबत ये जा करीत सावद्याच्या अँग्लो उर्दू हायस्कूलचे दहाव्या वर्गात मजल मारली आहे.
रावेर शहरातील गुलाम हुसेनच्या एका आप्तेष्ट असलेल्या सामाजिक कार्यकर्त्याने संजय गांधी निराधार योजना विभागातील लिपीक अमोल घाटे यांच्या ध्यानात हा प्रकार आणला असता, त्यांनी त्या अपंग विद्यार्थ्यास तातडीने तहसील कार्यालयात घेऊन येण्याचा सल्ला दिला होता. त्या अनुषंगाने जन्मतःच दिव्यांग असलेल्या गुलाम हुसेनखान सत्तारखान या इयत्ता १० वीतील उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यास तहसीलदार विजयकुमार ढगे यांच्या समोर त्याच्या अपंगत्वाच्या दाखल्यासह लिपीक अमोल घाटे यांनी संगांनि योजनेचे नायब तहसीलदार आर पी भावसार, अव्वल कारकून संगिता घोंगडे यांच्यासमवेत हजर केले असता, त्यांनी त्याची आस्थेवाईकपणे चौकशी केली.
किंबहुना, त्याने खाली बसून कागदावर उजव्या पायाच्या अंगठा व तर्जनीमध्ये पेन धरून काढलेले सुवाच्य व सुंदर अक्षरावरून त्याचा गुणात्मक बुद्ध्यांक पाहून, तहसीलदार विजयकुमार ढगे यांनी त्याच्या संजय गांधी निराधार योजनेच्या आर्थिक साहाय्यासाठी तातडीने प्रस्ताव दाखल करून संजय गांधी निराधार योजना समितीकडून विशेष लक्ष प्रभावाने ते मंजूर करण्याचे आश्वस्त केले. गुलाम हुसेनला, पायाच्या बोटांनी लिहिण्याचे बळ प्राप्त झाले असताना प्रशासनही आर्थिक साहाय्य देत सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी पुढे सरसावल्याने जनसामान्यांमधून एकच कौतुक होत आहे.