रावेर : वादळी पावसाच्या तडाख्यात दि. २५, २७, २९ व ३० मे व २ जून रोजी तालुक्यातील ५८ गावांतील ४ हजार ७१४ शेतकर्यांच्या १ हजार ८५३.९२ हेक्टर क्षेत्रातील केळीबागा जमीनदोस्त होऊन ८० कोटी ६४ लाख ४८ हजार रुपये नुकसानीचा अंतिम अहवाल तहसीलदार उषाराणी देवगुणे, गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल व तालुका कृषी अधिकारी एम.जी. भामरे यांनी जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे.
तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी मोहगण, अहिरवाडी, पाडळे व तापीकाठच्या खिर्डी, रेंभोटा, वाघाडी, धामोडी, सुलवाडी, कोळोदा, भामलवाडी, कळमोदा, ऐनपूर, निंबोल, विटवे व निंभोरासीम तथा सुकी काठच्या उटखेडा, भाटखेडा, सावखेडा, बलवाडी, सिंगत, मस्कावद व दसनूर परिसरातील ४४ गावांमधील ३ हजार ६२६ शेतकऱ्यांच्या १ हजार २८४ हेक्टर क्षेत्रातील केळी बागा दि २५, २७ ,२९ व ३० मे रोजी वादळी पावसाच्या तडाख्यात जमीनदोस्त होऊन ५७ कोटी ९० लाख ७२ हजार रु.चे नुकसान झाल्याचा अंतिम अहवाल यापूर्वीच तालुका प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला होता.
दरम्यान, त्यापाठोपाठ दि ३१ मे रोजी रायपूर व सुदगाव शिवारातील ४५ शेतकऱ्यांच्या ३६.२६ हेक्टर क्षेत्रातील केळीबागा जमीनदोस्त होऊन १ कोटी ४५ लाख ०४ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ दि २ जून रोजी पाडळे, अहिरवाडी, मोहगण, पिंप्री, केऱ्हाळे, मंगरूळ, जुनोने, रावेर, भोकरी व कर्जोद शिवारातील १ हजार ४३ शेतकऱ्यांच्या ५३२.८६ हेक्टर क्षेत्रातील केळीबागा जमीनदोस्त होऊन २१ कोटी २८ लाख ७२ हजार रु.चे नुकसान झाल्याचे पंचनामे पूर्णत्वास आले आहेत.
त्या अनुषंगाने ५८ गावातील ४ हजार ७१४ शेतकऱ्यांच्या १ हजार ८५४ हेक्टर क्षेत्रातील केळीबागा जमीनदोस्त होऊन ८० कोटी ६४ लाख ४८ हजार रु. नुकसान झाल्याचा अंतिम अहवाल तालुका प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे.