रावेर, जि.जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीचे चौथ्या वर्षाचे सभापती पद दुसऱ्यांदा चक्राकार पद्धतीने काँग्रेसच्या वाट्याला आले आहे. दुसºया वर्षी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या सभापती निवडीत संपूर्ण संचालक मंडळातील राजकारण व सहकारात ज्येष्ठ असलेल्या जिल्हा सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष राजीव पाटील यांच्या नावाला ऐनवेळी डच्चू देण्यात आल्याची पार्श्वभूमी पाहता, येत्या १३ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या सभापती पदासाठी काँग्रेसतर्फे पुन्हा इच्छुक असलेल्या काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी उपाध्यक्ष जिल्हा राजीव पाटील यांच्यासाठी ही सभापती निवड प्रतिष्ठेची ठरली आहे.काँग्रेसच्या गोटातून जिल्हा बँकेचे निवृत्त विभागीय वसुली अधिकारी डी.सी. पाटील हेसुद्धा इच्छुक असल्याने दोन्ही उमेदवारात एकमत होते किंवा नाही की दोघात लढत होते? याकडे तालुक्याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे व माजी आमदार अरूण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष राजीव पाटील, भाजपाचे माजी जि.प.सभापती सुरेश धनके, जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय पॅनेलने अठरापैकी १५ जागांवर निर्विवाद बहुमत प्राप्त करून परिवर्तनाचा कौल दिला होता.तद्नंतर, भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी-काँग्रेस व तद्नंतर भाजपा या चक्राकार पद्धतीने सभापती पदाचे सत्ता विकेंद्रीकरण करण्यात आले होते. सभापती पदासाठी भाजपतर्फे गोपाळ नेमाडे व श्रीकांत महाजन यांची नावे चर्चेत आहेत. असे असताना श्रेष्ठींकडून पीतांबर पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून सभापती पदाची माळ गळ्यात टाकली होती. दुसºया वर्षी काँग्रेसतर्फे संचालक मंडळातील ज्येष्ठ संचालक व काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजीव पाटील यांचे नाव चर्चेत असताना सर्वपक्षीय संचालकांनी त्यांचेच निकटचे स्नेही डॉ.राजेंद्र्र पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने राजीव पाटील यांनी खिलाडूवृत्तीने एक पाऊल मागे घेत संयम बाळगला होता. मात्र, सर्वपक्षीय संचालक मंडळातील मराठाबहूल अठरापैकी १० संचालकांचे असलेले प्राबल्य पाहता सहकारात व राजकारणात सेवाज्येष्ठता असताना ही माघार घ्यावी लागल्याचे शल्य त्यांच्या सहकार क्षेत्रातील अलिप्त धोरणातून उमटून गेले.तिसºया वर्षीच्या सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे व सर्वपक्षीय संचालक मंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने त्यांची एकमताने निवड करण्यात आली होती.दरम्यान, आता चक्राकार पद्धतीने पुन्हा काँग्रेसकडे सभापती पद चालून आले असल्याने काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष राजीव पाटील व जिल्हा बँकेचे निवृत्त विभागीय वसुली अधिकारी डी.सी.पाटील हे दोन्ही सभापती पदासाठी इच्छुक असल्याची चर्चा काँग्रेसच्या गोटात आहे. जिल्हयाच्या राजकारणात व सहकारात ज्येष्ठ असलेल्या राजीव पाटील यांना सर्वपक्षीय संचालक पसंती देतात काय की जिल्हा सहकारी बँकेचे निवृत्त विभागीय वसुली अधिकारी डी.सी.पाटील यांच्या सेवेतील अनुभवाला संधी देतात की मराठा समाज बहुल संचालक म्हणून बहूमताचे झुकते माप त्यांच्या पारड्यात टाकतात? हा मोठा औत्सुक्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.काँग्रेसच्या सहा संचालकांची परवा सभापती निवडीच्या अनुषंगाने एक औचित्याची बैठक आयोजित करण्यात आली असून, त्यात सभापती पदाच्या उमेदवारी संदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे. सर्वपक्षीय पॅनेलचे सर्वेसर्वा माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी काँग्रेसच्या संचालकांनी एकमताने ठरवावे तर माजी आमदार शिरीष चौधरी यांनी काँग्रेससह सर्वपक्षीय संचालक एकमताने काय तो निर्णय घेतील असे स्पष्ट केले आहे.