किरण चौधरीरावेर, जि.जळगाव : तालुक्यातील सातही महसूल भाग मंडळात माहे एप्रिल महिन्यात ४२ सेल्सिअंशपेक्षा जास्त अर्थात ४४.५ सेल्सिअंशपर्यंत तापमानाची सतत ५ ते १० दिवस उष्ण लहर राहील्याची नोंद महावेधच्या हवामानमापक यंत्रावर नोंद झाली आहे. त्यामुळे केळीबागा या प्रतिकूल अशा अतिउष्ण तापमानात होरपळून केळी उत्पादनाची अपरिमित हानी होत असल्याने हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत प्रतिहेक्टरी ३३ हजार रू. संरक्षित विम्याची रक्कम मंजूर झाली आहे. सद्य:स्थितीतील मे महिन्यात ४४ सेल्सिअंशपेक्षा सतत पाच दिवस अतिउष्ण तापमानाची लहर राहील्यास दोन्ही महिन्यातील नुकसानीसाठी प्रतिहेक्टर ४१ हजार रू.चा संरक्षित विमा विमा कंपनीला देय ठरणार आहे.हिवाळ्यातील ८ सेल्सिअंशपेक्षा कमी तापमानाची सतत ४ दिवसांची शीतलहर राहिल्याने ३३ हजार ५०० रू.चा संरक्षित विमा मंजूर झाला होता. आता एप्रिल महिन्यात सतत पाच दिवसांपासून तब्बल १० दिवस ४२ सेल्सिअंशपेक्षा जास्त तापमानाची उष्ण लहर राहिल्याने तूर्त ३३ हजार रुपये प्रतिहेक्टर संरक्षित विम्याची रक्कम मंजूर झाली आहे. तथापि, सद्य:स्थितीत असलेले तापमान पाहता या मे महिन्यातही ४४ सेल्सिअंशपेक्षा जास्त तापमानाच्या उष्णलहर सतत पाच दिवस राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. मे महिन्यानंतर प्रतिहेक्टरी ४१ हजार रू. संरक्षित विम्याच्या रकमेचा लाभ होण्याची केळी उत्पादकांना आशा आहे.ऐनपूर महसूल मंडळात २३ ते २८ एप्रिल दरम्यान किमान ४२.३८ सेल्सिअंश ते कमाल ४३.५ सेल्सिअंश तापमानाची नोंद झाली आहे. खानापूर महसूल मंडळात १६ ते १९ एप्रिल दरम्यान किमान ४२.३ सेल्सिअंश ते ४२.९८ सेल्सिअंश तापमानाची नोंद झाली आहे. खिर्डी महसूल मंडळात १२ ते १९ एप्रिल दरम्यान किमान ४२.६ ते कमाल ४४.५९ सेल्सिअंश तापमानाची नोंद झाली आहे. खिरोदा महसूल मंडळात ११ ते २० एप्रिल दरम्यान किमान ४२.४५ ते ४४.३९ सेल्सिअंश तापमानाची नोंद झाली आहे.निंभोरा बुद्रूक महसूल मंडळात दि १२ ते १९ एप्रिल दरम्यान किमान ४२.६ ते कमाल ४३..२५ सेल्सिअंश तापमानाची नोंद झाली आहे. रावेर महसूल मंडळात २४ ते २८ एप्रिल दरम्यान किमान ४२.१२ ते कमाल ४३. १७ सेल्सिअंश तापमानाची नोंद झाली आहे. तत्पूर्वी १६ ते १८ एप्रिल दरम्यान ४२.४ ते ४३.६८ सेल्सिअंश तापमानाची नोंद झाली आहे.दरम्यान, सावदा महसूल मंडळात १२ ते १८ एप्रिल दरम्यान ४२.३ ते ४३. ५६ सेल्सिअंश तर दि २१ ते २५ एप्रिल दरम्यान ४२.०६ ते ४४.०७ सेल्सिअंश तापमानाची नोंद झाली आहे.एप्रिल महिन्यातच उष्णतेच्या लाटा ४४ सेल्सिअंशवर झळाळत असल्याने या मे महिन्यातही ४४ सेल्सिअंशपेक्षा जास्त तापमानाची सतत पाच दिवसांची नोंद होण्याची शक्यता फारशी दूर नसल्याची प्रतिकूल परिस्थिती आहे. यामुळे दोन्ही महिन्यातील जास्त तापमानाचा प्रतिहेक्टरी ४१ हजार रू.चा संरक्षित विम्याचा लाभ होण्याच्या केळी उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
रावेर तालुक्यात केळी उत्पादकांना जास्त तापमानाचा प्रतिहेक्टरी ३३ हजार रू. संरक्षित विम्याची रक्कम मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2020 10:49 PM