- किरण चौधरी
रावेर, जि. जळगाव : उन्हाळ्यातील कमाल तापमान ४४ सेल्सिअसपर्यंत गेल्याने केळीची आवक काही प्रमाणात घटली आहे. दुसरीकडे आंब्याच्या उत्पादनात घट आणि उन्हाळी संत्री कमी प्रमाणात बाजारात आली. त्यामुळे केळी भावात सध्या तेजी आली आहे. त्यामुळे खान्देशातील केळी ही केळी बाजारात सध्या हुकमी एक्का ठरली आहे. १ मे रोजी ११३० रु. प्रतिक्विंटल असलेले केळीच दर दि. २३ मे रोजी १४०० रु. प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले आहेत.
यंदा मार्च महिन्यापासूनच प्रचंड तापमानातही बागांमधील केळीची पोषकता झपाट्याने वाढली आहे. केळी मालाची उपलब्धता लवकर झाली. मार्च ते मे महिन्यात आंध्र प्रदेश, गुजरातसह सोलापूर, नांदेड, शिरपूर, शहादा आदी ठिकाणी केळी उत्पादनात मोठी घट आली. मात्र, रावेर, यावल, बर्हाणपूर, मुक्ताईनगर तालुक्यांतील केळी मालाची बाजारपेठेत उपलब्धता झाली. इकडे बाजारपेठेत संत्री कमी आली आणि आंब्याच्या उत्पादनात आलेली निम्मी घट यामुळे खान्देशातील केळीने बाजारात जोरदार मुसंडी मारली आहे.
बर्हाणपूरच्या लिलाव बाजारात रोज २५० ते ३०० ट्रक केळीचा वर्णनावरून लिलाव केला जात असे, त्याच बाजारात आता केवळ १०० ते १५० ट्रक केळीचा लिलाव होऊ लागला आहे. त्याचाही फायदा खान्देशच्या केळीला झाला आहे.------रावेरच्या तजेलदार केळीने बाजारपेठेत मुसंडी मारली आहे. केळी निर्यात ठप्प झाली असल्याने दरवाढीतील चमक काहीशी मंदावली आहे. आखाती राष्ट्रांत केळी निर्यात कायम राहिली असती तर केळीने दोन हजार रुपये प्रतिक्विंटल दरापर्यंत मुसंडी मारली असती.- सदानंद महाजन, केळी निर्यातदार, रावेर.
सद्य:स्थितीत जेमतेम आवक असताना केळीची मागणी वाढली आहे. त्यामुळे केळीच्या भावात तेजी आहे.- रामदास त्र्यंबक पाटील, अध्यक्ष, रावेर फळ बागायतदार सहकारी संघ, रावेर.
सातत्याने केळी भावाचा चढता आलेख....दि. १ मे रोजी ११३० रु. प्रतिक्विंटलदि. ७ मे रोजी १२१० रु. प्रतिक्विंटलदि. १७ मे रोजी १३४० रु. प्रतिक्विंटलदि. २३ मे रोजी १४०० रु. प्रतिक्विंटल